शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येणार म्हणता; पण आम्ही येऊ द्यायला पाहिजे! | पुढारी

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येणार म्हणता; पण आम्ही येऊ द्यायला पाहिजे!

उस्मानाबाद ; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या आधीच ‘आम्ही पुन्हा येऊ’, असे सांगणार्‍या नेत्यांना जनतेचा अंदाजच आलेला नाही. ‘मी येणार, मी येणार’, असे तुम्ही म्हणता. पण आम्ही येऊ द्यायला पाहिजे, असा टोला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उस्मानाबादजवळील पाडोळी येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते. आज माझे वय 82 आहे. पण अजून मी थकलो नाही. जनतेची साथ आहे तोपर्यंत परिवर्तन आणण्याचे काम करत राहणार असल्याचे खा. पवार यांनी नमूद केले.

शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले. त्यांना राजमाता जिजाऊंची खंबीर साथ मिळाली. महात्मा फुलेंनी शिक्षणाचा जागर घातला, त्यात सावित्रीबाईंचा वाटा तितकाच मोलाचा होता. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाईंची खंबीर साथ होती. या महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून आजपर्यंत आमची वाटचाल राहिली आहे. काही जण मात्र या महापुरुषांचा अवमान करतात. हे मनाला न पटणारे आहे, असे म्हणत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता टोला लगावला.

Back to top button