राज्यातील साखर उत्पादनात कोल्हापूर आघाडीवर, दूधगंगा-वेदगंगा १२.९७ टक्के उतार्‍यासह प्रथम स्थानी | पुढारी

राज्यातील साखर उत्पादनात कोल्हापूर आघाडीवर, दूधगंगा-वेदगंगा १२.९७ टक्के उतार्‍यासह प्रथम स्थानी

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : राज्याने साखर उत्पादनाचा 100 लाख मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोल्हापूर विभागाने 26 लाख 47 हजार मेट्रिक टन साखर उत्पादन करीत राज्यात आघाडी घेतली आहे. साखरेच्या उतार्‍यातही 11.69 टक्क्यांचा उतारा नोंदवत कोल्हापूर विभाग प्रथम क्रमांकावर आहे. शिवाय, कारखानानिहाय साखर उतार्‍यामध्ये कोल्हापूर विभागातील दूधगंगा-वेदगंगा कारखाना 12.97 टक्के उतार्‍यासह राज्यात प्रथम स्थानावर आहे.

राज्यामध्ये चालू हंगामात 197 साखर कारखाने सहभागी झाले आहेत. या कारखान्यांमध्ये 9 कोटी 75 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. शुक्रवारी (4 मार्च) साखर आयुक्तांकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार साखर उत्पादन 100 लाख 38 हजार मेट्रिक टनांवर पोहोचले. यामध्ये राज्याचा सरासरी साखर उतारा 10.29 टक्के नोंदविला गेला आहे. गतवर्षी याच काळामध्ये 189 सहकारी साखर कारखान्यांनी 8 कोटी 51 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 85 लाख 18 हजार मेट्रिक टन साखर उत्पादन केले होते.

राज्यातील 189 सहकारी साखर कारखाने सध्या हंगामामध्ये सहभागी झाले आहेत. यापैकी 68 साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनात सहभाग दर्शविला आहे. या कारखान्यांमध्ये प्रामुख्याने बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलचे उत्पादन होते आहे. यंदा राज्यातील इथेनॉल उद्योगाने देशातील ऑईल कंपन्यांबरोबर चालू इथेनॉल वर्षासाठी (डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022) 111 कोटी लिटर्स इथेनॉल पुरवठा करण्याचे करार दाखल केले आहेत. या इथेनॉल निर्मितीसाठी राज्यातील 14 लाख मेट्रिक टन साखर वळविली जाणार आहे. याखेरीज राज्यात अद्याप गाळपासाठी शिल्लक असलेल्या उसाचा विचार केला, तर यंदा साखर उत्पादन यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढेल, अशी अपेक्षा आहे.

सोलापूर विभाग दुसर्‍या स्थानावर

गतवर्षीपेक्षा यंदाचे साखर उत्पादन 12.54 मेट्रिक टनांनी अधिक आहे. साखर उत्पादनात राज्यात सर्वाधिक 46 साखर कारखाने असलेला सोलापूर विभाग 21 लाख 31 हजार मेट्रिक टन उत्पादनासह दुसर्‍या स्थानावर, तर 29 कारखान्यांमध्ये गाळप सुरू असलेला पुणे विभाग 20 लाख 57 हजार मेट्रिक टन उत्पादनासह तिसर्‍या स्थानावर आहे.

Back to top button