कोल्हापूर : महापुरुषांच्या गावांतील ऐतिहासिक शाळांचे रूपडे पालटणार | पुढारी

कोल्हापूर : महापुरुषांच्या गावांतील ऐतिहासिक शाळांचे रूपडे पालटणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान असलेल्या आणि आधुनिक भारताला आकार देणारे महापुरुष महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंतच्या थोर समाजसुधारकांच्या जन्मगावांतील शाळा विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला एक कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने या शाळा अद्ययावत होऊन त्यांचे रूपडे पालटणार आहे. (कोल्हापूर)

महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत प्राचीन काळापासून संतांबरोबरच महापुरुषांचे योगदान महत्त्वाचे राहिले. महाराष्ट्रात समाजसुधारणा व परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम महापुरुषांनी केले आहे. सामाजिक समता, लोकशाही व मानवतावाद ही मूल्ये आयुष्यभर जोपासणार्‍या व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या दहा महापुरुषांच्या जन्मगावाचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राजर्षींचे मूळ घराणे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या हिंदुराव घाटगे विद्या मंदिर शाळेचा यात समावेश आहे. हिंदुराव घाटगे विद्या मंदिरची स्थापना 30 सप्टेंबर 1849 रोजी झाली. या शाळेस 173 वर्षांची मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. ना. गोपाळ कृष्ण गोखले, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या शाळेत शिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.

प्रत्येक शाळेस एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून सांस्कृतिक कार्य विभागास दिल्याचे कळते. या निधीतून शाळेच्या इमारतींची दुरुस्ती, हँड वॉश स्टेशन, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक लॅब, क्रीडांगण निर्मिती, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर त्या-त्या महापुरुषांचे कार्य व इतिहास सांगणारे भव्य संग्रहालय, विद्यार्थांची गुणवत्तावाढ, शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी या निधीची मदत होणार आहे.

राज्यात विकसित होणार्‍या 10 शाळा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ घराणे असलेल्या गावातील शाळा – कागल (जि. कोल्हापूर)
महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मगाव – खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेली पहिली शाळा – प्रतापसिंह हायस्कूल, सातारा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव – वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव – मुरुड (जि. रत्नागिरी)
साने गुरुजी यांचे जन्मगाव – पालगड (ता. दापोली, जि. रत्नागिरी)
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव – नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव – मोझरी (ता. तिवसा, जि. अमरावती)
संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव – शेंडगाव (ता. अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती)
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव – येडे मच्छिंद्र (ता. वाळवा, जि. सांगली)

Back to top button