आजपासून बारावीची परीक्षा ; नाशिक विभागात 1 लाख 63 हजार 679 विद्यार्थी | पुढारी

आजपासून बारावीची परीक्षा ; नाशिक विभागात 1 लाख 63 हजार 679 विद्यार्थी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा संपल्या असून, आज शुक्रवार (दि. 4) पासून लेखी परीक्षेला प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा तेथे परीक्षा केंद्र’ या धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हानिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यंदा नाशिक विभागातून 1 लाख 63 हजार 679 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यामध्ये कला शाखेच्या 61 हजार 160, वाणिज्य शाखेच्या 22 हजार 245 आणि विज्ञान शाखेच्या 74 हजार 704, तर एमसीव्हीएसीच्या 5 हजार 479 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच तंत्रविज्ञान शाखेचे 91 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विभागात 1 हजार 70 कनिष्ठ महाविद्यालये असून, 248 नियमित परीक्षा केंद्रे आहेत. ‘शाळा तेथे परीक्षा केंद्र’ या धर्तीवर 1 हजार 15 उपकेंद्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून 300 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्र संचालक व पर्यवेक्षकांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकांकडून घेतले हमीपत्र
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ असणार आहे. या केंद्रांमध्ये किंवा उपकेंद्रांमध्ये एका वर्गात फक्त 25 विद्यार्थीच परीक्षा देऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांच्या सोयी-सुविधांबद्दल मुख्याध्यापकांकडून हमीपत्र शिक्षण मंडळाने घेतले आहे.

जिल्हा     विद्यार्थी                  परीक्षा केंद्र
नाशिक    73,775                          420
धुळे        73,775                           199
जळगाव    48,504                        282
नंदुरबार    16,633                         144
एकूण      1,63,679                       1,015

हेही वाचा :

Back to top button