नाशिक मनपा : अंतिम प्रभाग रचना आठवडाभर लांबणीवर, अहवाल सादर करण्यास मुदतवाढ | पुढारी

नाशिक मनपा : अंतिम प्रभाग रचना आठवडाभर लांबणीवर, अहवाल सादर करण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबई या काही बड्या महापालिकांच्या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकतींची संख्या मोठी असल्याने सुनावणीअंती त्या संदर्भातील शिफारशींचा अहवाल सादर करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने दि. 5 मार्चपर्यंत वाढविली आहे. यामुळे या मुदतवाढीचा परिणाम अंतिम प्रभागरचनेच्या प्रसिध्दीवर होणार असल्याने संबंधित महापालिकांसह नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आठवडाभर लांबणीवर पडणार आहे.

अहवाल सादर करण्यास मुदतवाढ मिळाल्याने 15 मार्चपर्यंत मनपाची अंतिम प्रभाग रचना जाहीर होऊ शकते. नाशिकसह राज्यातील 18 महापालिकांची पंचवार्षिक मुदत 15 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे असून, नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत एकूण 211 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल तसेच राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस यांच्या उपस्थितीत 23 फेब—ुवारी रोजी सुनावणी झाली. महापालिका आयुक्त कैलास जाधव, विभागीय महसूल आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नगरपालिका शाखेचे उपआयुक्त संजय दुसाने, जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या उपस्थित झालेल्या या सुनावणीत 211 पैकी 149 हरकतदारांनी प्रत्यक्ष हजर राहत म्हणणे मांडले. 62 हरकतदार गैरहजर राहिले.

या सुनावणीनंतर शिफारशींचा अहवाल निवडणूक प्राधिकृत अधिकार्‍यांमार्फत विवरणपत्रासह 2 मार्चपर्यंत सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी 5,684, नवी मुंबई- 3,852, पुणे- 3,596, ठाणे- 1,962 तर मुंबई महापालिकेसाठी 812 हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींची प्रत्यक्ष पडताळणी, तथ्यांची तपासणी करून शिफारशींचा अहवाल सादर करण्यास विलंब लागणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.

प्राप्त हरकती 

नाशिक -211

पिंपरी चिंचवड-5,684

नवी मुंबई-3,852

पुणे-3,596

ठाणे-1962

मुंबई-812

मतदारयाद्यांचा कार्यक्रमही लांबणार
अंतिम प्रभागरचनेचा आराखडा लांबणार असल्याने प्रभागनिहाय मतदारयाद्यांच्या प्रसिद्धीचा कार्यक्रमही लांबणीवर पडणार आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतरच मतदारयाद्या जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवून नंतर प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या जाहीर होतील.

मे महिन्यात निवडणूक
अंतिम प्रभागरचना आणि त्यानंतर अंतिम मतदारयाद्यांचा कार्यक्रम लांबणार असल्याने निवडणुकीचा कार्यक्रमही लांबणार आहे. यामुळे मनपाची निवडणूक साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्धीसाठी मार्चअखेर उजाडेल. यानंतर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली.

हेही वाचा :

Back to top button