urea : कोल्हापूर जिल्ह्यात युरियाची टंचाई! | पुढारी

urea : कोल्हापूर जिल्ह्यात युरियाची टंचाई!

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : कच्च्या मालाच्या टंचाईमुळे सर्वत्र युरिया टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात युरिया खताची टंचाई आहे. पिकांसाठी वेळेत युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (urea)

उसाच्या लावणी व खोडव्यांच्या भरणीचे काम सुरू आहे. त्यासाठी युरियासह इतर खतांची शेतकर्‍यांना गरज आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जाऊन युरियाबाबत विचारणा करतात. परंतु, युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

युरिया (urea) विकत घेताना काही कृषी केंद्रचालक शेतकर्‍यांना इतर खते किंवा कीटकनाशक घेण्याची सक्ती करतात, तरच युरिया दिला जातो. शेतकर्‍यांना फक्त युरियाची गरज असते; मात्र नाईलाजाने शेतकर्‍यांना युरियासोबत अन्य उत्पादने विकत घ्यावी लागतात. कृषी केंद्रावर मुबलक युरिया उपलब्ध व्हावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

युरिया खताअभावी शेतकर्‍यांच्या ऊस, खोडवा पिकाची भरणी खोळंबली आहे. मका, सोयाबीन, भात पिकांसह अन्य पिके युरियाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये 70 हजार टन, तर रब्बी हंगामासासाठी 52 हजार टन असा एकूण 1 लाख 22 हजार टन युरिया वर्षभरात पिकांसाठी लागतो. त्यापैकी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत 94 हजार 500 टन युरियाची आवक झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सांगितले.

देशभरात खतांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाची टंचाई आहे. याचा परिणाम युरियावर झाला आहे. 15 फेब्रुवारी 2022 अखेर 1 लाख 22 हजार टन युरियाची आवक झाली आहे. मागणीच्या प्रमाणात शेतकर्‍यांना युरिया देण्यासाठी कृषी विभाग पाठपुरावा करत आहे.
– डी. डी. वाकुरे, जिल्हा कृषी अधीक्षक

Back to top button