नाशिक : महिला उमेदवारांना पूरक ठरणारा प्रभाग 18 | पुढारी

नाशिक : महिला उमेदवारांना पूरक ठरणारा प्रभाग 18

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ
आधीचा जुना प्रभाग क्र. 13 आणि आताचा नव्याने तयार झालेला प्रभाग क्र. 18 हा व्यावसायिक आणि व्यापारीदृष्ट्या सधन असलेला परिसर आहे. त्यातही व्यापार्‍यांकडून वर्गणी आणि पावत्या फाडणार्‍यांची या भागात काही कमी नाही. वर्षानुवर्षे या त्रासाला कंटाळलेल्या व्यापारी वर्गाकडून म्हणूनच महिला उमेदवारांनाच अधिक पसंती दिली जाते.

प्रभाग क्र. 18 मध्ये गंगावाडी परिसर, रविवार कारंजा, फावडे गल्ली, शालिमार, पंचशीलनगर, खडकाळी, कोकणीपुरा हा परिसर येतो. जुने नाशिकमधील बहुतांश 50 टक्क्यांपेक्षा अधिक भाग प्रभाग 18 मध्ये समाविष्ट आहे. या भागातील रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली, दूधबाजार असा मुख्य बाजारपेठेचा भाग असल्याने संपूर्ण शहरातून नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. यामुळे भागातील वाहतूक कोंडी हा प्रमुख ज्वलंत प्रश्न आजही कायम आहे. बहुमजली वाहनतळासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निधीची तरतूद केली जाते. अंदाजपत्रकात त्यासंदर्भात आश्वासने दिली जातात, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडीमुळे अनेक ग्राहक मुख्य बाजारपेठेकडे पाठ फिरवतात.

त्याचप्रमाणे जुने नाशिक भागातील अरुंद रस्ते हेदेखील प्रमुख कारण असून, या भागातील मालमत्ताधारकांना विशेष एफएसआय मिळावा, अशी खूप जुनी मागणी आजही कायम आहे. शासनाकडून याबाबत केवळ आश्वासने दिली जात असल्याने रस्त्यांचे रुंदीकरण आणि मालमत्तांचे नूतनीकरण होऊ शकलेेले नाही. तेली, मुस्लीम यासह संमिश्र प्रवर्गांचा समावेश असलेल्या या प्रभागात ‘पॅनल टू पॅनल’ म्हणून कधीच कुणा एका पक्षाला येथील मतदारांनी पसंती दिलेली नाही. त्यामुळे मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे, वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, मनसेच्या स्व. सुरेखाताई भोसले या निवडून आल्या होत्या. सुरेखाताई यांच्या निधनानंतर तिथे त्यांच्या स्नुषा अ‍ॅड. वैशाली भोसले या नगरसेविका म्हणून आज कार्यरत आहेत.

आज या भागात एकाही पक्षाचे पॅनल तयार नाही. इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे. त्यातही शिवसेनेकडून या प्रभागातील इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. महाविकास आघाडी झाली तर या प्रभागात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झालेली दिसून येईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या मर्यादित असल्याने विद्यमान नगरसेवकांना या ठिकाणाहून संधी मिळू शकते. नगरसेविका वत्सला खैरे या सलग पाच पंचवार्षिक निवडून येत आहेत.

असा आहे प्रभाग
गंगावाडी, तेली गल्ली, वकीलवाडी, राजेबहाद्दर हॉस्पिटल, पंचशीलनगर, स्टेडियम कॉम्प्लेक्स, जीपीओ, फावडे लेन, नेहरू गार्डन, कोकणीपुरा, गंजमाळ.

प्रमुख इच्छुक उमेदवार
जुना प्रभाग क्र. 13 मधील बराचसा भाग प्रभाग क्र. 19 मध्ये जोडला गेल्याने काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे यांचे प्रभाग क्र. 18 की 19 असे जर तर सुरू आहे. तर 18 मधून माजी नगरसेवक अ‍ॅड. यतीन वाघ, शिवसेनेचे माजी महानगर संघटक बाळू कोकणे, माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे, गजानन शेलार, मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांच्या पत्नी रश्मी भोसले, दीपक डोके, माजी उपमहापौर अशोक गोसावी, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल हे इच्छुक उमेदवार आहेत.

ड्रेनेज जोडणी झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. रस्त्यांची कामे बर्‍यापैकी झाली आहेत. मुख्य मिरवणूक मार्गावरील वीजतारा भूमिगत झाल्याने महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. प्रभागात बाजारपेठ असल्याने पार्किंग होणे फार गरजेचे असून, आगामी काळात त्यावर सर्वांनीच लक्ष घालावे. – विजय ठाकरे, व्यावसायिक

कोरोनामुळे प्रभागातील विकासाची कामे होऊ शकली नाही. स्मार्ट सिटी कंपनीने प्रभागातील
रस्ते फोडून ठेवल्याने व्यापार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. प्रभागातील रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न दूर झाले आहेत. भद्रकाली भाजीबाजार पटांगण येथील कचराकुंडी हटवून त्या जागी मनपाने ग्रीनजिमची व्यवस्था करावी.
– चेतन वावरे, रहिवासी

प्रभागातील मुख्य उद्यान अतिक्रमणाच्या गराड्यात सापडले आहे. उद्यान अनेक दिवसांपासून बंद आहे. शालिमार येथील थॉमस चर्चसमोरील आणि सावानासमोरील वाहतूक बेटाची दुरवस्था दूर झाली पाहिजे. रिक्षा आणि फेरीवाल्यांना शिस्त लावल्यास अनेक प्रश्न दूर होऊ शकतात. – अजय अग्रवाल, व्यावसायिक

हेही वाचा :

Back to top button