

वास्को; पुढारी वृत्तसेवा : वेर्णा औद्योगिक वसाहतीलगत कोमुनिदादच्या जमिनीवर औद्योगिक कचरा जाळण्यात येत असल्याने तसेच टाकाऊ साहित्य तेथे टाकण्यात येत असल्याने केसरव्हाळ येथील स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा जाळण्यात येत असल्याने आसपासच्या वस्तीमध्ये धूर पसरून त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.
कोमुनिदादच्या मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी कचरा टाकला जातो व त्याला आग लावली जाते. या आगीमुळे तयार झालेला धूर जवळपासच्या वस्तीमध्ये पसरतो. आरोग्याला घातक असलेल्या धुरामुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत.
या धुराचा परिणाम लहान मुलांवर तसेच वृद्धांच्या प्रकृतीवर होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. कचरा जाळण्यात येत असल्याप्रकरणी यापूर्वी वेर्णा पोलिस स्थानकामध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी एका कंपनीने तेथे कचरा टाकला असल्याचे मान्य केले होते. मात्र, तेथे कचरा टाकून आग लावण्याचे प्रकार कमी झाले नाही.
अलिकडेच तेथे औद्योगिक कचर्याला लावण्यात आलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्याची वेळ आली असल्याचे काही युवकांनी सांगितले.
हेही वाचलंत का?