रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा: सागरी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) मर्यादा शिथिल करून नियंत्रण हद्द ५० मीटर करण्याच्या अंतिम आराखड्याला राष्ट्रीय सागरी हद्द प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सागरी किनार्याजवळील रोजगार निर्मितीच्या माध्यमातून उभारणार्या स्थानिक पर्यटन विकासाला फायदा होणार आहे.
या निर्णयामुळेे कोकणातील किनारी जिल्ह्याबरोबरच किनारी गावांनाही दिलासा मिळणार आहे. कोकणात विस्तीर्ण आणि समृद्ध सागरी किनारे आहेत. गोव्याच्या धर्तीवर येथेही पर्यटन व्यवसायातून स्थानिकांना रोजगारांची संधी उपलब्ध होऊ शकते.
मात्र, सागरी किनारी क्षेत्रामध्ये पाचशे मीटर अंतराच्या सीआरझेडमुळे पर्यटन व्यवसायात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पर्यटनवाढीसाठी ही अट शिथिल करण्याची मागणी पर्यटन क्षेत्रातील विविध संघटनांनी शासनाकडे केली होती.
अखेर पाचशे मीटरची ही अट पन्नास मीटरवर आणल्याने पन्नास मीटरच्या पुढील किनारा क्षेत्रावर पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन व्यवसाय विस्तारासाठी संधी मिळणार आहे.
या निर्णयामुळे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या अनेक संधी, रोजगार उपलब्ध होतील तसेच पर्यटनाच्या अनेक सुविधा प्राप्त होतील. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणच्या किनार्यावर पर्यटकांची संख्या वाढेल आणि पर्यटनातून मिळणार्या महसुलातही वाढ होईल. लवकरच या निर्णयाचे अंतिम आराखडे उपलब्ध होणार असल्याचे प्रादेशिक पर्यटन विभागातील सूत्रांनी सांगितले.
पर्यटन उद्योग हा प्रदूषणकारी उद्योग नाही. मिळालेल्या सवलतीचा संयमाने वापर करत पर्यावरणीय र्हास टाळून पर्यटनाच्या मोठ्या संधी निर्माण करणे शक्य आहे. सीआरझेडच्या सुधारित प्रस्तावित नियमामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पर्यटन व्यवसायाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
– गुरूप्रसाद खानविलकर, वेळणेश्वर, पर्यटन व्यावसायिक
हेही वाचा