नाशिक : कुटुंबासह हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर राहणार, संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा | पुढारी

नाशिक : कुटुंबासह हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर राहणार, संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे भोसले 26 फेब्रुवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार असून, त्यांच्या या आंदोलनास सकल मराठा समाजाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कुटुंबासह हजारो मराठा बांधव त्यांच्या आंदोलनात सामील होणार असल्याचा निर्धार जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीला प्रमुख समन्वयक उपस्थित होते.

आझाद मैदानावर जाण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता तीन समाजबांधवांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कमिटीत अमित नडगे, सागर पवार, अमोल जगळे यांचा समावेश असून, मराठा बांधवांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. दरम्यान, संभाजीराजे यांनी राज्य शासनाला दिलेल्या प्रस्तावावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्यानेच संभाजीराजे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. प्रस्ताव किती व्यावहारिक होता, त्याचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली होती. समितीनेही अभ्यास करून राजेंच्या प्रस्तावाला व्यावहारिक म्हणून स्वीकारण्याची शिफारस राज्य सरकारला केली. तथापि सरकारकडून केवळ शाब्दिक आश्वासनापलीकडे ठोस अंमलबजावणी झाली नाही. बैठकीला करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, मनीषा पवार, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, विजय खर्जुल, आशिष हिरे, विलास जाधव, सचिन पवार, संदीप लबडे, बंटी भागवत, संजय सोमासे, विशाल कदम, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, खंडू आहेर, वंदना कोल्हे, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, पूजा तेलंग उपस्थित होते.

उपोषणाचा निर्णय
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पत वाढवून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे, सारथीसारखी संस्था सक्षम करून त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी मराठा तरुण पात्र बनविणे, तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि न्यायालयाने निर्देशित केलेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ पूर्वलक्षी नियुक्त्या देणे, कोपर्डीच्या भगिनीला न्याय देण्यासाठी पूर्व निकालाला दिले गेलेले आव्हान खोडून काढण्यासाठी न्यायिक प्रक्रियेला वेग देणे अशा निवडक मुद्द्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा एवढीच संभाजीराजे आणि सकल मराठा समाजाची मागणी आहे. यासाठीच उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button