सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : माळेगाव एमआयडीसीतील रोहित फोम कंपनीत बुधवारी (दि. 23) दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक आग लागून सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कंपनीनमध्ये मॅट्रेस (गाद्या) बनविण्यासाठी लागणार्या फोमचे उत्पादन घेतले जाते. कंपनीच्या आवारात फोम बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल ठेवलेला होता. जवळच विजेचे मीटर असलेली पेटी खांबावर बसवलेली होती. शेजारीच कंपनीतील कर्मचार्यांच्या मोटारसायकली उभ्या होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास गोदामास अचानक आग लागली व कच्च्या मालाने पेट घेतला. विजेचे मीटर व ताराही जळून गेल्या. शेजारील मोटारसायकलींचे (क्र. एमएच 15 जीडी 7611 व एमएच 15 जीके 731) मोठे नुकसान झाले. कंपनीच्या ताडपत्र्यांचेही आगीच्या धगीने नुकसान झाले आहे. अंदाजे सुमारे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाल्याचे कंपनीचे संचालक तानाजी पवार यांनी सांगितले.
अग्निशमन दलाचे बंब बोलावून आग आटोक्यात आणली गेली. शेजारील कंपन्या व रोहित फोम कंपनीतील कर्मचार्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे निश्चित कारण समजले नसले तरी वीज मीटरच्या पेटीत स्फोट अथवा स्पार्किंग होऊन उडालेला ठिणग्यांनी आग लागली असावी, असा अंदाज आहे. दरम्यान, मीटर जळून गेल्याने कंपनीचे कामकाजही ठप्प झाले असून, वीज वितरण कंपनीने त्वरित दुरुस्ती करून वीजप्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी कंपनी संचालकांनी केली आहे.