सप्तशृंगगडावरील यात्रा करात मागच्या दाराने वाढ, स्थायी समिती सभेवर न मांडताच केली वाढ | पुढारी

सप्तशृंगगडावरील यात्रा करात मागच्या दाराने वाढ, स्थायी समिती सभेवर न मांडताच केली वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला अंधारात ठेवून प्रशासनाने सप्तशृंगगडावर यात्राकाळात प्रतिव्यक्ती किमान पाच रुपये व अधिकाधिक 20 रुपये यात्रा कर आकारण्यास ग्रामपंचायतीला परवानगी दिली आहे. जिल्हा परिषदेने परवानगी दिलेल्या पत्रावर 14 जानेवारीच्या स्थायी समितीच्या सभेतील ठरावानुसार कार्यवाही केल्याचे नमूद केले असले तरी प्रत्यक्षात त्या स्थायी समिती सभेत असा कोणताही ठराव मांडण्यात आला नव्हता व त्याला मंजुरीही देण्यात आली नव्हती. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने मागच्या दाराने यात्रा कर वाढ केल्याची चर्चा आहे.

सप्तशृंगगडावर यात्रा कर आकारणी करण्यावरून 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये तीव्र विरोध करण्यात आला होता. अखेरीस नाममात्र आकारणी करण्यास परवानगी द्यावी, असे सांगून स्थायी समिती सदस्यांचा होकार घेण्यात आला. त्यानुसार सप्तशृंगगडावर यात्राकाळाव्यतिरिक्त खासगी वाहनातून येणार्‍या प्रत्येक यात्रेकरून प्रतिव्यक्ती दोन रुपये यात्रा कर आकारण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर मागील वर्षी 2021 मध्ये ग्रामपंचायतीने या करामध्ये वाढ करण्याची मागणी केली.

जिल्हा परिषदेने या मागणीला तत्काळ प्रतिसाद दिला व 14 जानेवारीच्या सभेत प्रत्यक्षात हा विषय मांडलेला नसताना व त्यावर चर्चा होऊनही त्याला मंजुरी दिलेली नसतानाही मागच्या दाराने स्थायी समिती सभेत तो विषय घुसवण्यात आला. त्यानंतर 22 फेब—ुवारीस सप्तशृंगगडावर येणार्‍या भाविकांकडून प्रतिव्यक्ती पाच ते 20 रुपये कर आकारण्याची मुभा ग्रामपंचायतीला दिली आहे. यामुळे खासगी वाहनातून गडावर जाणार्‍या भाविकांना प्रतिव्यक्ती पाच रुपये मोजल्याशिवाय दर्शन घेता येणार नाही. विशेष म्हणजे सरकारी वाहनातून येणार्‍या अधिकार्‍यांना यातून सुट देण्यात आली आहे.

यात्रा कराच्या अटी

  • सार्वजनिक वाहने, दिव्यांग, लहान मुले यांना करातून सूट
  • नवरात्रोत्सव व यात्राकाळात आकारणी नाही
  • या करातून यात्रेकरूंसाठी सोयी-सुविधा पुरवाव्यात
  • कर दिल्यानंतर प्रत्येक यात्रेकरूला पास बंधनकारक
  • काही तक्रारी आल्यास संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची

स्थायी समितीच्या 14 जानेवारीच्या सभेस मी ऑनलाइन उपस्थित होतो. या सभेमध्ये सप्तशृंगगडावर यात्रा कर आकारण्याचा विषय उपस्थितच झाला नव्हता.
– महेंद्रकुमार काले, सदस्य, स्थायी समिती, सभासद

हेही वाचा :

Back to top button