नाशिक : वनविभागाचे आता ग्राहकांच्या घरी धाडसत्र ; अनोंदणीकृत वन्यजीव सुपूर्द करण्याचे आवाहन | पुढारी

नाशिक : वनविभागाचे आता ग्राहकांच्या घरी धाडसत्र ; अनोंदणीकृत वन्यजीव सुपूर्द करण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वन्यजीव तस्करीचे नाशिक कनेक्शन उघडकीस आल्यानंतर शहरातील विविध पेट शॉपवर वनविभाग नाशिक (पश्चिम भाग) कार्यालयामार्फत धाडसत्र राबविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात कासव, पोपट, हेग्जहॉग आदी वन्यजीव आढळून आले आहेत. पेट शॉपच्या मालकांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यामार्फत विक्री झालेल्या वन्यजिवांच्या ग्राहकांची माहिती घेण्यात आली आहे. या ग्राहकांच्या घरी धाडसत्र राबविण्याची तयारी वनविभागाने सुरू केली आहे.

धाडसत्रात कोणत्याही नागरिकाकडे नोंदणीकृत नसलेले वन्यजीव आढळून आल्यास, त्याच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात वन्यजीव बाळगल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही उपनवसंरक्षक नाशिक (पश्चिम भाग) कार्यालयाकडून स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पेट शॉपमधून खरेदी केलेले अथवा अन्य स्रोतामार्फत मिळविलेले व विदेशी प्रजातीचे वन्यजीव ज्यांची परिवेश प्रणालीवर नोंदणी झालेली नाही. व ते वन्यजीव संरक्षण कायदा-1927 अन्वये संरक्षण प्रदान करण्यात आलेले आहेत, अशा प्रकारचे वन्यजीव बाळगले असल्यास, नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधून उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) कार्यालयाकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन पश्चिम वनविभागाने केले आहे.

हेही वाचा :

Back to top button