लंडन : पाच वर्षांची मुलगी बनली लेखिका! | पुढारी

लंडन : पाच वर्षांची मुलगी बनली लेखिका!

लंडन : सध्याच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात मुलांचे अवांतर वाचन कमी होत असल्याचे म्हटले जाते व त्यामध्ये तथ्यही आहेच. मात्र, या काळातच अनेक लहान वयाची मुलं चक्‍क लेखक-लेखिकाही बनत आहेत. आता ब्रिटनमधील अवघ्या पाच वर्षांच्या बेला जे. डार्क नावाच्या एका मुलीने पुस्तक लिहून सर्वांना थक्‍क केले आहे. ती जगातील सर्वात लहान वयाची लेखिका ठरली आहे.

अनेक मुलं सहा-सात वर्षांची झाल्यावर मुळाक्षरे गिरवत असतात किंवा तोडकंमोडकं वाचन करीत असतात. अशा वयात डॉर्सेटच्या वेमाऊथ येथील एका किंडरगार्टनमध्ये शिकत असलेल्या या मुलीने ‘द लॉस्ट कॅट’ (हरवलेलं मांजर) अशा शीर्षकाचे एक पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आहे. तिने गेल्यावर्षीच हे पुस्तक लिहिले होते आणि त्याबाबत आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, ज्यावेळी त्यांनी तिचे हे पुस्तक वाचले त्यावेळी तिची कल्पनाशक्‍ती, भाषेची जाण, सृजनशीलता पाहून ते थक्‍कच झाले. तिची आई चेल्सी सायमे आणि वडील माईल्स डार्क यांना लेकीच्या या प्रतिभेचा अभिमानही वाटला. तिने लिहिलेल्या या कथेत मांजरीचे एक पिल्‍लू आईला न सांगताच बाहेर जाते आणि हरवते. या भावुक कथेत आईचे महत्त्व, जगाचे वास्तव तिने सांगितले आहे. ‘जिंजर फायर प्रेस’ नावाच्या एका प्रकाशन संस्थेने तिचे हे पुस्तक प्रकाशित केले. विशेष म्हणजे या पुस्तकातील सर्व चित्रेही बेलानेच बनवलेली आहेत.

Back to top button