धुळे : विनापरवानगी पुतळाप्रकरणी प्रशासन-ग्रामस्थ आमनेसामने | पुढारी

धुळे : विनापरवानगी पुतळाप्रकरणी प्रशासन-ग्रामस्थ आमनेसामने

धुळे पुढारी वृत्तसेवा धनुर ग्रामपंचायतीच्या आवारात शिवाजी महाराज यांचा पुतळा विनापरवानगी बसवल्यानंतर धनुर ग्रामस्थ आणि प्रशासन आमने-सामने आले. हा पुतळा तातडीने काढून घेण्यात यावा यासाठी महसूल प्रशासनाने ग्रामपंचायतीला नोटीस बजावली. पुतळा हटवण्याची कार्यवाही आज सुरू करताच गावातील ग्रामस्थांनी पुतळ्या भोवती ठिय्या आंदोलन सुरू केले. परिणामी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाची चर्चा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुतळा आहे तसाच राहू द्यावा, अशी भूमिका घेत यशस्वी मध्यस्थी केली. दरम्यान गावात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

धनुर ग्रामपंचायतीच्या आवारात शिवजयंतीच्या रात्री चबूतऱ्यावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानुसार सोनगीर पोलीस ठाण्याने ही माहिती महसूल प्रशासनाला तातडीने कळवली. यानंतर तहसीलदार यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या नावे नोटीस जारी केली. या नोटीसमध्ये संबंधित पुतळा हा सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार बसवला गेला नसल्याची बाब स्पष्ट करीत तातडीने पुतळा काढून घ्यावा. तसेच या संदर्भात कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, अशी नोटीस बजावली. दरम्यान, आज मोठा पोलिस फौजफाटा गावात पोहोचला. यावेळी गावात पुतळा हटवत असल्याची माहिती कळल्याने  ग्रामस्थांनी पुतळ्या भोवती आंदोलन सुरू केले.

पुतळा आहे तिथेच राहू द्यावा तसेच प्रशासनाला पुतळा काढू देणार नाही, अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी पोलीस पथक आणि प्रशासनाविरोधात संघर्षाची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, ही माहिती कळल्याने आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण पाटील यांनी तातडीने गावात धाव घेतली. यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन समवेत चर्चा करून जनभावना कळवली. याची माहिती त्यांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना देत गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. शिवाजी महाराज हे प्रत्येकाचे आराध्य दैवत असून त्यांचा पुतळा येथून हटवू नये, अशीच प्रत्येक व्यक्तीची भूमिका असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या संबंधितांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी. तोपर्यंत पुतळा आहे तेथेच राहू द्यावा असे सुचवले. त्यामुळे हा पुतळा काढण्याची भूमिका प्रशासनाने तूर्त सोडून दिली आहे; पण आपण कायद्याचा आदर करणारे नागरिक असल्याने शासनाने पुतळा बसवण्यासाठीच्या घालून दिलेल्या नियमांचे पूर्तता करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जमावबंदीचा आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button