पंतप्रधानांचे वक्‍तव्य चीड आणणारे : पृथ्‍वीराज चव्हाण | पुढारी

पंतप्रधानांचे वक्‍तव्य चीड आणणारे : पृथ्‍वीराज चव्हाण

कराड ; पुढारी वृत्तसेवा  कोरोनाच्या सुरुवातीच्या कालावधीत मानवतेच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने प्रवासी व परप्रांतीय मजुरांना आपल्या घरी पोहचविण्‍याचा निर्णय घेतला हाेता. त्यामध्ये सरकारी यंत्रणा, कोव्हीड प्रतिबंधक उपाययोजना सर्व सुरु होत्या. असे असतानापंतप्रधान काँग्रेस पक्षाला व ते सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला दोष देत आहेत. हे हास्यास्पद नाही; पण चीड आणणारे वक्तव्य आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे प्रमुख उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, प्रवासी व परप्रांतीय मजुरांना कोरोनाच्या सुरूवातीच्या कालावधीत घरी पाठवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य हे वैफल्य व नैराशेचे लक्षण आहे. त्यावेळी सर्व सेवाभावी संस्थांनी प्रवासी व परप्रांतीय मजुरांना आपल्या घरी जाण्याकरता आपापल्या परीने सोय केली होती. मोदी सरकारला कोरोनाच्या सुरुवातीच्या कालावधीत मजुरांना घरी पाठवण्यात संपूर्ण अपयश आले होते. त्यावेळी बायकामुले हाताशी धरून व पाठीवर गाठोडे घेऊन अनेकजण रस्त्याने चालत असल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.

त्यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की झाली आहे. त्यावेळी काही सेवाभावी संस्थांनी विशेषतः काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन या मजुरांना आपापल्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. या लोकांना घरी न पाठवणे क्रूरता आहे. त्यांना आपल्या आप्तस्वकीयांपासून लांब ठेवणे, त्यांनी घरी जाऊ नये, अर्थव्यवस्था टिकावी म्हणून येथेच राहावे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. ते अत्यंत क्रूरतेचे लक्षण होते. त्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला. आता पंतप्रधान काँग्रेस पक्षाला व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला दोष देत आहेत. ही बाब हास्यास्पद नाही पण चीड आणणारी आहे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Back to top button