डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज उंडाळकर पुरस्काराने गौरव | पुढारी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज उंडाळकर पुरस्काराने गौरव

उंडाळे ; पुढारी वृत्तसेवा : थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या 48 व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे (ता. कराड) येथे आज (शुक्रवार) होणार्‍या स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीकडून देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाचे नियम पाळून दादा उंडाळकर स्मारक भवन येथे दुपारी 2 वाजता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व स्वा. सै. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्‍वस्त तथा जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. याचवेळी स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेसोबतच सामाजिक क्षेत्रातही राष्ट्रीय पातळीवर मोलाचे योगदान दिले आहे. परखड व सडेतोड लिखाणातून त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र मानदंड स्थापित केला आहे. ‘पुढारी’च्या माध्यमातून त्यांनी अनेक सार्वजनिक प्रश्‍नांना वाचा फोडली आहे.

सर्वसामान्यांवरील अन्याय दूर करत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. यासह त्यांच्या अन्य कार्यांची दखल घेत स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीकडून स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

Back to top button