

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील बाजारात मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. रविवार आणि गुरुवारी वारणा आणि कृष्णाकाठच्या शेतकर्यांचा येथे बाजार भरतो. बाजारातील गर्दीत चोरटे हातोहात मोबाईल लंपास करून पोलिसांना डिवचत आहेत.
'पुष्पा' चित्रपट स्टाईलने मोबाईल लंपास होत असल्याने नागरिक हताश होत आहेत तर, पोलिस मात्र शोध घेण्यात व मोबाईल ट्रॅकिंग करण्यात अपयशी ठरत आहेत.
इस्लामपूरचा मोठा बाजार हा वाळवा, शिराळा तालुक्यातील असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होते. बाजार भरणार्या यल्लमा चौकातील आचार्य जावडेकर मार्केटमधील जागा अपुरी आहे. शेतकरी रस्त्यावर बसलेले असतात तर व्यापारी मुख्य बाजार कट्ट्यावर असतात. एक लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या शहरात सामान्य नागरिक, शासकीय, निमशासकीय नोकरदार यांची बाजारात मोठी वर्दळ असते.
बाजारातील गर्दीत नागरिक खरेदी करण्यामध्ये व्यस्त असल्याचा फायदा उठवित चोर हातोहात मोबाईल लंपास करीत असल्याने व त्याचा शोध घेण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. पोलिसांना जणू आव्हानच चोरटे देत आहेत. नागरिक हे भाज्या खरेदी करीत असताना वरच्या शर्टच्या खिशातील मोबाईल अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लंपास केले जातात.
मोबाईल चोरीच्या घटनांतून मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोबाईल चोरीची गहाळ म्हणून नोंद करून त्याच नंबरचे नवीन कार्ड घेण्यास नागरिकांची पसंती आहे. महागडा मोबाईल चोरीला गेला तरी हरकत नाही परंतु, त्यातील फोटो, मजकूर, फोन नंबर आणि कागदपत्रे महत्त्वाची असतात. त्यामुळे मोबाईल ही जणू मानवाची कुंडलीच समजली जाते. नागरिकांचे बेसावधपणे वावरणे हे महाग पडू शकते. त्यामुळे इस्लामपूरकरांना सावध राहण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था योग्य रहावी याकरिता नियोजन केले पाहिजे.
नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच आयईएमआय नंबरसह पोलिस स्टेशनला माहिती द्यावी. पोलिसांनीही वेळ वाया न घालवता लगेचच संगणकावर मोबाईल ट्रॅकिंग, ट्रेस लावला पाहिजे, म्हणजे लगेचच मोबाईलचे लोकेशन समजेल आणि चोराला पकडणे सोपे होईल, अन्यथा मोबाईलचे लोकेशन दुसर्या राज्यातील अथवा दुसर्या जिल्ह्यातील दाखवेल. चोरांची गँग लगेचच पसार होत नाही. त्यामुळे इस्लामपुरताच मोबाईलचे लोकेशन सापडू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.