भंडारा : १० मार्चनंतर सरकारमध्ये बदल – नाना पटोले | पुढारी

भंडारा : १० मार्चनंतर सरकारमध्ये बदल - नाना पटोले

भंडारा : पुढारी वृत्तसेवा ः सध्या सरकारमध्ये जे सुरू आहे, त्यात काही बदल करण्याची वेळ आली आहे. येत्या १० मार्चनंतर हे बदल होतील, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी भंडारा येथे करुन राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. या वक्तव्याने सरकारमध्ये नेमके काय बदल होणार आहेत, यावर आता चर्चांना पेव फुटले आहे. काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मंगळवारी रात्री भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.

पाच राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. माझे सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. सध्या सरकारमध्ये जे काही चालू आहे, त्यात दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकानंतर म्हणजेच १० मार्चनंतर सरकारमध्ये बदल करुन नवील बदल दिसू लागतील. या माध्यमातून लोकांची कामे केली जाणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे सरकारमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते ठिक नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे आता नक्की काय बदल होणार आहे, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा येथे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. काही दिवसांपासून या मेळाव्याची जोरदार चर्चा होती. परंतु, या मेळाव्यात सर्व नवख्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. कॉंग्रेसला बळ देणाऱ्या प्रभावी कार्यकर्त्यांची यावेळी वाणवा दिसून आली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत कॉंग्रेस हा मोठा पक्ष ठरला असला तरी पक्षाला एकहाती सत्ता मिळू शकली नाही. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात प्रभावी कार्यकर्त्यांचा प्रवेश अपेक्षित होता. परंतु, मेळाव्यात असे काही घडले नाही.

हेही वाचलतं का?

Back to top button