दिलासादायक! देशात सलग आठव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासांत ३४ हजार रुग्णांची नोंद | पुढारी

दिलासादायक! देशात सलग आठव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासांत ३४ हजार रुग्णांची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. २४ तासांत कोरोनाचे ३४ हजार ११३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग आठव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या १ लाखांच्या खाली आल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात ९१ हजार ९३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.१९ टक्क्यांवर आला आहे. देशात सध्या ४ लाख ७८ हजार ८८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण ४ कोटी १६ लाख ७७ हजार ६४१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ९ हजार ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

याआधीच्या दिवशी देशात ४० दिवसानंतर कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ५० हजारांच्या खाली आली होती. दिवसभरात ४४,८७७ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ६८४ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच कोरोनामुक्तीचा दर ९७.५५ टक्क्यांवर पोहोचला होता.

देशात ७ ऑगस्ट २०२० रोजी कोरोना संक्रमित रुग्णसंख्या २० लाखांवर तर २३ ऑगस्ट रोजी ३० लाखांवर आणि ५ सप्टेंबर २०२० रोजी ४० लाखांवर गेली होती. १६ सप्टेंबर २०२० रोजी रुग्णसंख्या ५० लाख, २८ सप्टेंबर २०२० रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी २०२० रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख आणि २० नोव्हेंबर २०२० रोजी ९० लाखांवर गेली होती. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरु लागली आहे. देशातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

ब्राझीलमध्ये एका दिवसात ३१४ जणांचा मृत्यू

जर्मनीत कोरोनाचे नवे ७६,४६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ५४,२२० नवे रुग्ण तर ३१४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ब्राझीलमधील एकूण रुग्णसंख्या २ कोटी ७४ लाख ७९ हजार ९६३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत येथे ६ लाख ३८ हजार ३६२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

मार्चच्या मध्यावधीपर्यंत काेराेनाची तिसरी लाट ओसरेल

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येमध्‍ये घट होत आहे. मार्चच्या मध्यावधीपर्यंत काेराेनाची तिसरी लाट बर्‍यापैकी ओसरेल, अशी शक्‍यता आहे. कोरोनाचे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकारात्मक आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  राज्यात मास्क मुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. जशी परिस्थिती येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Back to top button