ABG shipyard : गुजरातमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा बँक घोटाळा; SBI सह २२ बँकांना 'चुना' | पुढारी

ABG shipyard : गुजरातमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा बँक घोटाळा; SBI सह २२ बँकांना 'चुना'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना 22 हजार 842 कोटी रुपयांचा गंडा घातल्याबद्दल सीबीआयने एबीजी शिपयार्ड लि. कंपनी आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (ABG shipyard)

ABG shipyard : या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी संचालक

संथानम मुथुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवातिया यांनाही आरोपी करण्यात आले आहे. एसबीआयने 8 नोव्हेंबर 2019 रोजी यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. त्यावर 12 मार्च 2020 रोजी सीबीआयने संबंधितांकडून स्पष्टीकरण मागविले होते. सुमारे दीड वर्ष तपास करून सीबीआयने 7 फेब्रुवारीला एफआयआर दाखल केला. सीबीआयने दाखल केलेला हा सर्वांत मोठा बँक घोटाळा आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

ABG shipyard : घोटाळा काय?

एबीजी कंपनीला एसबीआयसह 28 बँका आणि वित्त संस्थांनी 2,458.51 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. 2012 ते 17 दरम्यान कंपनीच्या अधिकार्‍यांनी रक्कम दुसरीकडे वळविणे, विश्वासघात करणे असे अनेक बेकायदेशीर ‘उद्योग’ केले. कर्ज ज्या उद्देशाने देण्यात आले होते, त्यापेक्षा वेगळ्याच उद्देशावर कर्जाची रक्कम खर्च करण्यात आली.

Back to top button