जळगाव : कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या नावाखाली १ लाख  ८४ हजार ८५० रुपयांचा गंडा | पुढारी

जळगाव : कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या नावाखाली १ लाख  ८४ हजार ८५० रुपयांचा गंडा

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या नावाखाली पारोळा तालुक्यातील एका व्यक्तीला १ लाख  ८४ हजार ८५० रुपयेचा गंडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील टिटवे येथे मायाबाई पाटील यांना ५ फेब्रुवारी रोजी त्याच्या मोबाईलला व्हॉट्सअप कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या संबधित व्यक्तीने मायाबाई यांना “कौन बनेगा करोडपती” मध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचे सांगितले . सदरच्या बक्षिसाची  रक्कम मिळण्यासाठी दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना एक कॉल आला.

हा सर्व प्रकार  मायाबाई यांनी त्यांचे पती व मुलाला सांगितला. त्यानुसार त्यांनी मॅसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला व त्यांना बँक खात्याचा नंबर मागितला. लॉटरीची एवढी मोठी रक्कम बँकेत जमा करण्यासाठी खात्याची मर्यादा वाढवावी लागेल अशी बतावणी केली. यासाठी समोरील व्यक्तीने मायाबाई यांना ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगितले.

त्यानुसार मायाबाई यांनी गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून पहिल्यांदा १८५ रूपये टाकले. त्यानंतर चार वेळा ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २५ हजार, दोन वेळा १५ हजार , १० हजार , तीन वेळा २० हजार व ३५ हजार असे एकूण १ लाख  83 हजार 185 रुपये पाठवले.

पैसे पाठवल्यावर कुठलीही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष भंडारी हे करीत आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button