निफाडमधील तरुणाच्या खून प्रकरणी जन्मठेप | पुढारी

निफाडमधील तरुणाच्या खून प्रकरणी जन्मठेप

निफाड : पुढारी वृत्तसेवा
येथील तरुण अमोल  मवाळ (24) यास नवसारी (ता. मालेगाव) शिवारात बोलावून त्याचा विहिरीत ढकलून खून केल्याप्रकरणी योगेश शिवाजी मोरे यास मालेगाव न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी आजीवन सश्रम कावासाची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य संशयिताची खटल्यातून मुक्तता केली आहे.
अमोल मवाळ यांचा 28 मार्च 2010 रोजी सायंकाळी खुलताबादला जात असल्याचे सांगून गेला होता. मात्र, परत आला नव्हता. त्यानंतर 2 एप्रिल 2010 रोजी मनमाड पोलिसांना त्याचा मृतदेह नवसारी शिवारातील विहिरीत आढळून आला होता. याबाबत त्याचा भाऊ अविनाश मवाळ याने मनमाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला होता.

गुन्ह्याच्या तपासात अमोल यास प्रेयसीला भेटण्याच्या निमित्ताने योगेश मोरे व शांताराम काकळीज यांनी नवसारी शिवारात बोलावले व तेथेच त्यास विहिरीत ढकलून देत खून केला होता. अमोलकडे असलेली अल्टो कार योगेश मोरेकडे आढळून आली होती. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचे आरोपपत्र सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ठोंबळ यांनी मालेगाव सत्र न्यायालयात दाखल केले.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. व्ही. एन. हाडपे यांनी सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयाने साक्षीपुराव्यावरून आरोपी योगेश शिवाजी मोरे यास दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे, तर शांताराम भगवान काकळीज याची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाने अमोल यांच्या आई मंजूषा मवाळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

Back to top button