सकाळी आईचा अंत्यसंस्कार पार पडला अन् सायंकाळी मुलाचा ; अख्ख्या गावात सन्नाटा | पुढारी

सकाळी आईचा अंत्यसंस्कार पार पडला अन् सायंकाळी मुलाचा ; अख्ख्या गावात सन्नाटा

गोंदेगाव : पुढारी वृत्तसेवा : एकाच दिवशी मातृवियोग आणि पुत्रवियोग नशिबी आलेल्या पिता अन् मातेचे दुःख किती खोल असेल याची मोजदाद करताच येणार नाही. निफाड तालुक्यातील देवगाव येथील संतोष बोचरे यांच्या कुटुंबात ही घटना घडली आहे. सकाळी आईचा अंत्यसंस्कार पार पडला आणि सायंकाळी मुलाचा अंत्यसंस्कार होतांना बघण्याची दुर्दैवी वेळ बोचरे कुटुंबावर ओढवली.

देवगाव येथील जगदंबा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक संतोष जगन्नाथ बोचरे हे शेती व्यवसाय करतात. घरात आई, वडील, पती, पत्नी आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे. पैकी त्यांच्या मातोश्री द्रोपदाबाई जगन्नाथ बोचरे (वय ८३) यांचे शनिवार ता. ०५ रात्री १:०० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सकाळी ११:०० वाजता झाला. दरम्यान यावेळी बोचरे यांची मुले शैलेश आणि रोशन काम करण्यात व्यस्त होते. अंत्यविधीच्या धावपळीत पाळीव शेळ्यांकडे दुर्लक्ष झाले होते. ते शैलेशच्या लक्षात आले. बोचरे यांच्या घरापासून दोनशे फूट अंतरावर असलेल्या पाण्याचा चर आहे. त्या शेजारील शेवरीच्या झाडाचा पाला आणण्यासाठी शैलेश गेला असता तोल जाऊन चरात पडला. शैलेश पाण्यात पडल्याचे समजताच घरच्यांनी त्यास बाहेर काढले. देवगाव येथील डॉ. किरण पाटील यांच्या समर्थ क्लिनिक मध्ये दाखल केले. तेथून निफाड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता शैलेश यास मृत घोषित करण्यात आले.

याबाबत लासलगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर आदी तपास करत आहेत.

गाव सुन्न झालं 
शैलेश देवगांव मधील श्री. डी. आर.भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत होता. कॉलेजवरून आल्यावर शेतीत आई- वडिलांना मदत करत होता. समजदार आणि मनमिळावू, शांत स्वभाव म्हणून गावात ओळखला जायचा. त्याच्या आकस्मित मृत्यूची बातमी धडकताच समाजमन सुन्न झाले आहे. आजी पाठोपाठ नातवाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button