नाशिक : सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस नाईक पद रद्द करण्याचा प्रस्ताव | पुढारी

नाशिक : सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस नाईक पद रद्द करण्याचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक हे पद रद्द करून पोलीस उपनिरीक्षक यापदावर रुजु झालेला पोलीस अधिकारी पोलीस अधिक्षक पदी सेवानिवृत्त होईल या पध्दतीने त्यांची पदोन्नती करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे पोलिस नाईक हे पद रद्द करून पोलिस दलात १० वर्ष सेवा बजावलेल्या पोलिस अंमलदार यांना पोलीस हवालदार, २० वर्ष सेवा बजावलेल्या पोलीस अंमलदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक व ३० वर्ष सेवा बजावलेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिली.

पोलिस महासंचालक संजय पांडे हे शनिवारी (दि.५) नाशिक दौऱ्यावर होते. पोलिस आयुक्तालयात पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्या पदोन्नती समारंभात पांडे बोलत होते. या कार्यक्रमात शहर पोलीस आयुक्तालयातील 5 सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक, १५ पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक, २३ पोलीस नाईक ते पोलीस हवालदार तसेच २४ पोलीस अंमलदार ते पोलीस नाईक या पदावर पदोन्नती मिळालेल्या अधिकारी व अंमलदाराचा पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या खांद्यावर स्टार, रिबीन, फिती लावल्या.

पांडे यांनी सांगितले की, नागपुर येथील शहर वाहतुक शाखेत काम करणा-या एका महिला पोलीस अंमलदाराने रात्री उशीरा पर्यंत कर्तव्य बजावत असतांना संसार चालविणे अवघड होत असल्याची खंत मेसेज व्दारे कळविली होती. त्यानंतर पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदारांना ८ तास डयुटी देण्या बाबत आदेश देण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वर्षातुन किमान २० दिवस नैमित्तिक रजा मिळावी याबाबतचा प्रस्ताव देखील राज्य शासनास पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तालयातील कार्यक्रमात पोलीस महासंचालक पांडे यांनी अनपेक्षितपणे उपस्थित राहून सर्वांना सुखद धक्का दिला. पोलिस महासंचालकाच्या हस्ते अधिकारी व अंमलदार यांना पंचकोनी स्टार व लाल/निळ्या रंगाची रिबिन, तसेच सोनेरी फित व गुलाबपुष्प देवून गौरविण्यात आले. पदोन्नती मिळालेल्या अधिकारी अमलदारांच्या कुटूबीयांनी हे क्षण मोबाईल मध्ये टिपून कायमस्वरूपी आठवणी जतन केल्या.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button