लता मंगेशकर यांची मनात खोलवर रुजलेली मराठी गाणी !

लता मंगेशकर यांची मनात खोलवर रुजलेली मराठी गाणी !
Published on
Updated on

धनंजय कुलकर्णी, मुक्त पत्रकार व चित्रपट अभ्यासक

लताच्या या प्रतिभाशाली व अलौकीक स्वराचं वर्णन करताना कवी कुसुमाग्रज यांनी म्हटले होते 'सृष्टीतील कोकीळा फक्त वसंतातच गात असतात, पण या कोकीळेने मात्र प्रत्येक ऋतुला वासंतिक स्वरांचा रंग दिला आहे.' तर दुसरे ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर यांनी लताच्या स्वराबाबत/गाण्यांबाबत बोलताना 'अबोलीचा रंग व बकुळीचा गंध लाभलेली अक्षय स्वरातील गाणी' असे कौतुकोद्गार काढले होते . खांडेकरांना लताचे 'ओ सजना बरखा बहार आयी' (परख) हे गीत खूप आवडायचे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. लं नी ' या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे नि लताचा स्वर आहे ' अशा शब्दात या स्वराला दाद दिली होती. त्यांना लताजींचे 'तू मेरे प्यार का' (धूल का फूल) खूप आवडायचे, त्यांनी या हळुवार अंगाई गीताबाबत खूप छान लिहीलय ! साहित्य सम्राट आ. अत्रेंनी या स्वराला 'लोण्यात खडीसाखर मिसळलेला अवीट मधुर स्वर' म्हटले! असा एकही रसिक नाही ज्याने लताजींच्या स्वरावर प्रेम केले नाही. लतादिदीने मराठीत गायलेल्या एकूण गीतांची संख्या ४१० आहे.

लताजींच्या गायनाचा शुभारंभ मराठी संगीतकाराकडेच झाला. तो काळ मोठा विलक्षण होता. देशात स्वातंत्र्य लढयाचा अपूर्व उत्साह खळाळत होता. जगात दुसऱ्या महायुध्दाने थैमान घातले होते. सांस्कृतिक विश्वात याचं प्रतिबिंब उमटणं स्वाभाविकच होतं. पुढे फाळणीची वेदना कळ देवून गेली. मराठी सांस्कृतिक विश्वात त्या वेळी भावगीतांचा जमाना होता. भाव गीतांचा बादशहा गजानन वाटवे तेंव्हा आपल्या गायकीने रसिकांच्या दिलात अढळ स्थान मांडून होते.

याच काळात बबनराव नावडीकर, गोविंद पोवळे, माणिक वर्मा, सरोज वेलींगकर, सुधीर फडके ही मंडळी जनतेच्या समोर होती. वाटव्यांच्या भावगीतांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती. आणि याच काळात लताजींचा स्वर्णस्पर्शी स्वर रसिकांपुढे आला आणि स्वरानंदाचा अभिषेक सुरू झाला. गेली साठ पासष्ट वर्षे या स्वराने आम्हाला नवरसाची प्रचिती देण्याऱ्या गीतांची अनुभूती दिली. या स्वराने आम्हाला जगण्याचा अर्थ दिला व आमचं जीवन रसिलं/सुरीलं बनवलं. लताजींच्या मराठी गीतांचा आपण जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा त्यांनी वसंत प्रभूं कडे गायलेल्या गीतांना प्रामुख्याने आठवू लागतो. एकीकडे 'आशा भोसले-गदीमा-सुधीर फडके' हे त्रिकूट रसिकांना प्रतिभेचे नवनवे अविष्कार देत होते आणि दुसरीकडे 'लता-पी सवाळाराम-वसंतप्रभू' हे त्रिकूट रसिकांच्या भावभावनांचे विश्व हळूवार पणे फुलवत होते. तमाम मराठी रसिकांचे भावविश्व या गीतांनी समृध्द बनलं.

या त्रयीची आठवण काढली की डोळयापुढे येते 'गंगा यमुना डोळयात उभ्या काजा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा' हे गीत ! १९४९ सालचं हे गाण आजही पापण्यांच्या कडा ओलावते. 'कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनीया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला' या गीतातील लताच्या स्वरातील कातरता तिचं पितृप्रेम व्यक्त करते. या त्रयीने हर तऱ्हेचे, प्रत्येक भावनांचे, प्रत्येक रसाचे गाणे दिले. लताजींच्या कोवळया स्वरातील 'हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील कां ?' 'नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते' या गीतातील कोवळया प्रेमाच्या अंकुराची नाजूकता लताजींनी लिलया टिपली आहे.

त्या काळातील प्रेमातील मुग्धता, त्यातील कोवळीक, आणि मुख्य म्हणजे 'लज्जा' हा जेंव्हा स्त्रियांचा मुख्य अलंकार होता त्या काळातली प्रेमाची आर्तता या साऱ्यात एक नादमय गोडवा होता अन या गोडव्याचाच प्रत्यय ठायीठायी येतो. ''मधु मागसी माझ्या सख्या परी', 'लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची', 'सप्त पदीही रोज चालते ', या भावगीतांनी तमाम तरूण तरूणींचे भावविश्व गुलाबी झाले. प्रेमातील समर्पणाच्या उदात्त भावनेचा जयघोष यात होता. या गीतात नाजूक शृंगार आहे, गुलाबी प्रणय आहे. स्वरात शुध्द चंचलता आहे, गीतात सात्विक भावना आहे तर सूरात लोभस अवीटता आहे.

'चाफा बोलेना चाफा चालेना', 'हरवले ते गवसले का गवसले ते हरवले का?', 'कळा ज्या लागल्या जीवा' वसंत प्रभूंनी स्वरसाज चढवताना कधीही सूरांना शब्दांवर आक्रमण करू दिलं नाही. त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही भावगीतं लख्ख आठवतात! लताजींनी वसंत प्रभूंकडे बरीचशी भक्ती गीतही गायलीत. 'जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला', 'राम हृदयी राम नाही', 'श्रीरामा घनश्यामा', 'घट डोईवर घट कमरेवर सोडी पदरा नंदलाला नंदलाला रे', 'विठ्ठल सम चरण तुझे धरते', या आणि इतर भक्तीगीतांचे लताजींनी अतिशय मंगलस्वराने त्यांचे सोने केले!

आठवायला गेलं तर लताजींची चिक्कार मराठी गाणी मनाचे फेर धरून नाचू लागतात. त्यात ज्ञानदेवांपासून भा. रा. तांबे पर्यंत, कुसुमाग्रज, वसंत बापट पासून थेट सुधीर मोघ्यां पर्यंतची गाणी असतात. या मराठी गीतांनी तमाम मराठी रसिक सुखावला विशेषत: आजच्या संगीताच्या कत्तलीच्या युगातही हिच गाणी पहाटेच्या हळुवार/मंद वायुलहरी सारखी मनाला प्रसन्न करून जातात. 'या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या' हे खळयांकडचं गाणं! त्यातील आर्तता व हार्मोनियमच्या सूराने गीताशी जमवलेली समरूपता सारचं अलौकिक दिव्य ! बालकवीच्या लेखणीतून उतरलेले 'माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे, अक्षय गाणे अभंग गाणे हे गाणे' हे गीत ऐकल्यावर ते लताजींच्या स्वराबाबातच लिहीलय की काय असा भास होतो.

दैव जाणीले कुणी, धुंद मधुमती रात रे रात रे ही गदीमांची गाणी, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीलं कार्य काय , तिन्ही सांजा सखे मिळाल्या, कशी काळ नागिणी सखे गं वैरीण झाली नदीही भा. रा. तांब्यांची गाणी आजही मनाला सुखावून जातात. भावगीता तील प्रत्येक शब्दाला लताच्या स्वराने चिरंजीव केले. जीवनात ही घडी अशीच राहू दे, राजा सारंगा माझ्या सारंगा, सावर रे सावर रे,गुणी बाळ कसा जागसी कारे ,सांग कधी कळणार तुला, श्रावणात घन नीळा बरसला, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई ,गगन सदन तेजोमय , वादळ वारं सुटलं गं, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं, मोगरा फुलला या गीतांवर गेल्या चार पिढया पोसल्या आहेत. लताजींच्या मराठी गीतातून दिसणारी सात्विकता, पारदर्शकता, सारे अमंगल जाळून मनाला परमतत्वाला जवळ नेणारी दिसतात.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news