जळगाव : अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; महावितरणकडून वीज कनेक्शन मिळत नसल्याने संताप | पुढारी

जळगाव : अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; महावितरणकडून वीज कनेक्शन मिळत नसल्याने संताप

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : अमळनेर तालुक्यातील सात्री येथील योगराज प्रल्हाद पाटील या शेतकऱ्याला महावितरणकडून वीज कनेक्शन दिले जात नसल्याने  शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यास वेळीस ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

अमळनेर तालुक्यातील सात्री येथील रहिवासी योगराज पाटील हे शेतकरी असून त्यांच्याकडे दहा बिघे एवढी शेती आहे. शेतीत मक्याचे पीक लावले आहे. शेतात वीज कनेक्शन मिळावे यासाठी तब्बल दहा महिन्यांपासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र त्याकडे महावितरणकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांनी यांसर्दभात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी यांनी सूचना करुनही कुठलीही कार्यवाही आत्तापर्यंत झालेली नाही.

दुसरीकडे वीज कनेक्शन नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक जळत आहे. शेतकरी योगराज पाटील यांनी अखेर महावितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. प्रतिबंधात्मक कारवाई करून शेतकऱ्यास सोडून देण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button