मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांची युद्धपातळीवर तयारी - पुढारी

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांची युद्धपातळीवर तयारी

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : भाजपने मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी स्वतंत्र कार्यकर्त्याची नियुक्ती केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान केंद्रानुसार कार्यकर्त्यांचे गट नेमले आहेत. काँग्रेसने बूथनिहाय प्रमुख म्हणून दोन कार्यकर्त्यांची डिजिटल नोंदणी करण्यास प्रारंभ केला आहे, तर शिवसेनेेने गटप्रमुखांची नियुक्ती करीत प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच प्रमुख राजकीय पक्ष संघटनाबांधणीवर भर देत असल्याचे दिसून येते.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचना फेब्रुवारीत जाहीर होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची निवडणूक लढविण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होत असून, काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

भाजपची नेहमीप्रमाणे जय्यत तयारी झाली असून, महापालिकेचा अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्याद्वारे पुढील वर्षी शहरासाठीचे नवीन प्रकल्प जाहीर करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संपर्क साधला. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमांतून पक्षाने केंद्रापासून स्थानिक पातळीपर्यंत केलेल्या विकासकामांची पुस्तिका देत त्यांनी प्रचार सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला कार्यकर्त्यांचा मेळावा, विकासकामांची उद्घाटने याद्वारे त्यांनी वातावरणनिर्मिती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. या पद्धतीने निवडणूक प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे.

दुसर्‍या बाजूला भाजपने विकासाची कामे कशी केली नाहीत, ते मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पूर्वीच्या कालखंडात ठरलेली कामे करण्यावरच भाजपने गेल्या पाच वर्षांत भर दिला असून, त्यातही त्यांनी भ—ष्टाचार केला असल्याचा आरोप या दोन्ही पक्षांचे नेते करीत आहेत.

राष्ट्रवादी शिवसेना युती शक्य

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर त्यांच्यात बैठकाही झाल्या आहेत. प्रभागरचना आणि महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया वेग घेणार आहे. त्या वेळी प्रभागनिहाय आघाडीचे उमेदवार ठरविता येणार असल्याने त्या वेळीच आघाडीच्या रचनेला निश्चित स्वरूप प्राप्त होईल. या दोन्ही पक्षांच्या आपापल्या पातळीवर निवडणुकीची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू केलेली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्यामुळे पक्षाने संभाव्य उमेदवाराची यादी करण्यास सुरुवात केली आहे.

बूथपातळीवरील कार्यकर्त्यांची नावे ठरवून त्यांची डिजिटल नोंदणी करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. प्रत्येक बूथसाठी एक महिला व एक पुरुष कार्यकर्त्याला प्रमुख म्हणून नियुक्त केले जाणार आहे. 40 मतदान केंद्रांमागे एक प्रमुख निवडला असून, शहराचे बारा भाग केले असून, त्यावरही स्थानिक नेते नेमले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यकर्ते मतदान केंद्रनिहाय काम करणार आहेत. पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी मतदारांशी संपर्क करून भाजपविरोधात प्रचार करण्याची मोहीम फेब्रुवारीत राबविणार आहेत.

Back to top button