नाशिक : ‘नमामि गोदा' प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ वाढविण्यासाठी भाजपकडून हालचाली ; जाणून घ्या या प्रकल्पाविषयी | पुढारी

नाशिक : ‘नमामि गोदा' प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ वाढविण्यासाठी भाजपकडून हालचाली ; जाणून घ्या या प्रकल्पाविषयी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘नमामि गंगा’ या प्रकल्पाच्या धर्तीवर नाशिकमध्ये साकारण्यात येणार्‍या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाकरिता सल्लागार नियुक्त करण्यासाठी मागविलेल्या निविदांची छाननी करण्यात येणार असून, त्यासाठी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सात अधिकार्‍यांची समिती नेमली आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सहा निविदा प्राप्त झालेल्या आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ वाढविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रकल्पामुळे गोदावरी व तिच्या उपनद्यांची प्रदूषणापासून सुटका होईल. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घाट विकसित करण्यासाठी ‘नमामी गोदा’ प्रकल्प राबविण्याचा संकल्प सत्तारूढ भाजपने केला आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जलशक्तीमंत्री यांची भेट घेतली. त्यानंतर महासभेच्या मंजुरीनंतर 1823 कोटींचा प्रकल्प तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. छाननी समितीत कार्यकारी अभियंता राजेद्र आहेर, जितेंद्र पाटोळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, गणेश मैंद, उपअभियंता नितीन राजपूत, अभियंता नितीन पाटील, अभियंता बाजीराव माळी यांचा समावेश आहे.

असा आहे प्रकल्प…
गोदावरी नदी व उपनद्यांच्या काठच्या 150 कि.मी. लांबीच्या मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती, क्षमतावाढ, सुधारणा, मलजल अडविणे व वळविणे – 225 कोटी, मखमलाबाद व कामटवाडा येथे अनुक्रमे 45 दशलक्ष लिटर आणि 54 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारणे – 198 कोटी, नव्याने विकसित रहिवासी भागात 200 मि.मी. ते 600 मि.मी. व्यासाच्या मलवाहिका टाकणे – 100 कोटी, नदीकाठ सुशोभीकरण, घाट विकास, हेरिटेज डीपीआर समाविष्ट करणे – 800 कोटी, प्रदूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी लागणारी यंत्रणा उभारणे – 500 कोटी.

हेही वाचा :

Back to top button