वृक्षतोड टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे नवे डिझाइन ; आदित्य ठाकरे यांच्या आदेशामुळे वृक्षावरील संकट टळले | पुढारी

वृक्षतोड टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे नवे डिझाइन ; आदित्य ठाकरे यांच्या आदेशामुळे वृक्षावरील संकट टळले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिडकोतील त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल या वादग्रस्त उड्डाणपुलांसाठी 200 वर्षे पुरातन वृक्षासह सुमारे 588 वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने त्यालाशहरातील वृक्षप्रेमींनी विरोध केला असून, त्याची कुणकुण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मनपा आयुक्तांशी संपर्क साधून, वृक्षतोड न करता पुलासाठी नव्याने डिझाइन तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, उड्डाणपुलाचे डिझाइन तयार करताना, या मार्गात येणार्‍या वृक्षांची माहिती मनपाने का दडवली, तसेच वृक्षतोडीची नोटीस देण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेतली का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उड्डाणपुलातील अनियमिततेसंदर्भात भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली असून, भाजपचे सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, माजी गटनेते जगदीश पाटील यांनी उड्डाणपुलासंदर्भात अनेक प्रकारचे आक्षेप नोंदविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दंड थोपटले असून, निविदा प्रक्रिया ते प्राकलनातील बदल, याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

त्यात आता उड्डाणपुलासाठी तब्बल 588 वृक्ष तोडावे लागणार असल्याची बाब वृक्षप्रेमींनी शनिवारी (दि. 22) समोर आणली. त्याची दखल घेत पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करीत 200 वर्षे पुरातन वृक्ष तसेच अन्य वृक्षांची तोड न करता, उड्डाणपूल कसा बांधला जाईल, यासाठी नव्याने डिझाइन तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

पर्यावरणप्रेमींचे आंदोलन; सोशल मीडियावर संताप
सिडको : उंटवाडी येथील 200 वर्षे जुने वडाचे झाड तोडण्यासाठी मनपाने नोटीस चिकटवून हरकती मागविल्या होत्या. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप करीत, झाड व देवस्थान दोन्ही वाचविले. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले असून, त्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चाही केली. या संदर्भात श्री म्हसोबा महाराज यात्रा कमिटीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक दत्ता पाटील, सदाशिव नाईक व शिष्टमंडळाने पालकमंत्री छगन भुजबळ यांना भेटून निवेदन दिले. त्यांनीही झाडे तोडण्यास विरोध दर्शविला होता. अनेक नागरिकांनी याबाबत वडाच्या झाडाला वाचवावे, असे आवाहन केले होते. शनिवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील, संतोष सोनपसारे, विजय पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे, अजिंक्य गिते आदींनी आंदोलन केले होते तसेच नागरिकांनीही तीव्र विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेत ना. ठाकरे यांनी आयुक्तांशी चर्चा करीत उड्डाणपुलाची डिझाइन बदलण्यास सांगितले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा करून पुलाचे काम करताना दुर्मीळ व हेरिटेज वृक्षांची तोड न करता, नवीन डिझाइन तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सोमवारी (दि. 24) नवीन डिझाइनसाठी अधिकार्‍यांना स्थळपाहणीबाबत सांगण्यात आले आहे.
– कैलास जाधव,
आयुक्त, मनपा

हेही वाचा ;

 

Back to top button