

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग व लसीकरण दुपटीने वाढवावेत, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. तसेच नाइलाजास्तव, 'नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री मोहीम' अधिक तीव्र करताना त्याची अंमलबजावणी न करणार्या खासगी आस्थापनांवर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे ना. भुजबळांनी सांगितले.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंर्त्यांनी शनिवारी (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आठ दिवसांत रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली असताना, कोरोना नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्यात, असा प्रश्न ना. भुजबळांनी उपस्थित केला. केवळ बैठका घेऊन कोरोना कमी होणार नसून, प्रत्यक्ष कारवाई आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी यंत्रणांना फैलावर घेतले. जिल्ह्यात सहा ते सात लाख नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतला नसल्याबद्दल ना. भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. अंगणवाडी सेविका, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून या नागरिकांचा शोध घेत त्यांना लशीचा दुसरा डोस दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना नियंत्रणात प्रशासनाला जनतेची साथ अपेक्षित आहे. 'नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री' मोहिमेत खासगी आस्थापनांनी प्रशासनाला मदत करावी. या आदेशाचा भंग करणार्या आस्थापना बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी आस्थापनांनी नियमांचे पालन करीत मदत करावी, असे आवाहन ना. भुजबळ यांनी केले. दरम्यान, 335 मेट्रिक टन ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध असून, 47 प्राथमिक आरोग्य केंद्रांत ऊभारलेले ऑक्सिजन प्लांट वापरास मान्यता देण्यात आल्याचे ना. भुजबळांनी सांगितले. कोरोना मदतीच्या 12,978 अर्जांपैकी 7,938 अर्ज मंजूर केले, तर 2,115 अर्जांची पुनर्तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती ना. भुजबळांनी दिली.
'…तर शाळा बंद करणार'
जिल्ह्यात 1 जानेवारीपासून आजपर्यंत 24,482 बाधित आढळून आले असून, त्यापैकी 2,689 बालके आहेत. एकूण परिस्थिती बघता, जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, शाळा सुरू करताना पालक व शाळा व्यवस्थापनांची जबाबदारी अधिक आहे. सर्दी, पडसे व ताप असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन ना. भुजबळांनी केले आहे. विद्यार्थी बाधित आढळणार्या शाळा तातडीने बंद करण्यात येतील. बिटकोत बालकांसाठी 120 खाटा व 10 व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आल्याची माहिती ना. भुजबळांनी दिली.