जळगाव : प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने विवाहितेचा मृत्यू ; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप | पुढारी

जळगाव : प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने विवाहितेचा मृत्यू ; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

जळगाव: पुढारी वृत्तसेवा ; शहरातील श्रीकृष्ण कॉलनी येथील विवाहितेचा प्रसृतीनंतर अपेक्स या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तश्राव झाल्याने शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. पूजा जयप्रकाश विश्‍वकर्मा वय ३० हिने मुलाला जन्म दिला असून काही तासातच त्याच्या आईचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पूजा हिच्या कुटुंबियांनी केला आहे.

जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा हे वास्तव्यास आहेत. त्यांचे बजरंग बोगद्याजवळ जयेश ऑटो पार्टस नावाने गॅरेज आहे. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी जळगावातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले.

याठिकाणी नार्मल प्रसूती होवून मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली असून तिला अपेक्स या रुग्णालयात दाखल करावे लागेल असे डॉक्टरांकडून पूजाच्या पती जयप्रकाश तसेच कुटुंबियांकडून सांगण्यात आले. अपेक्स हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रक्तश्राव थांबत नसल्याने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया पार पडली. पूजा हिची प्रकृती ५० टक्के चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र ४८ तासापर्यंत तिला अतिदक्षता विभागात निरिक्षणाखाली ठेवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर २ वाजेच्या सुमारास पूजाची प्रकृती पुन्हा खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती जयप्रकाश हे पाहण्यासाठी गेले असता, पूजा हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मयत पूजा हिची दुसरी प्रसूती आहे, यापूर्वी एक मुलगा आहे. आता जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. मात्र पूजाचा मृत्यू झाला.

नॉर्मल प्रसूती झाली. जन्माला आलेल्या मुलाची प्रकृती उत्तम होती. नार्मल प्रसूती असतांना अचानक प्रकृती कशी खालावली. पूजाचा आधीच मृत्यू झालेला होता असा आरोप जयप्रकाश यांनी केला आहे. मात्र डॉक्टरांनी उशीरा कळविले. मृत्यूनंतर लगेचच बिल व इतर कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूजाचा मृत्यू झाला असून कारवाई करावी अशी मागणी आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करावे त्यानंतर मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे मयत पूजा हिचे पती जयप्रकाश तसेच सासू पूष्पा विश्‍वकर्मा यांनी बोलतांना सांगितले.

हेही वाचा ;

वीज बिल कमी करण्याचा पर्याय झाला आणखी सोपा, जाणून घ्या मोदी सरकारने काय केली घोषणा

Back to top button