
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : आपल्या सभोवताली अनेक झाडे असतात. परंतु, त्यांची नावे आपल्याला माहीत नसतात. या झाडांची माहिती एका क्लिकवर मिळेल, अशी प्रणाली अवघ्या दहा वर्षांच्या आदिश्री अविनाश पगार या चिमुकलीने तयार केली आहे. झाडांविषयीच्या जागृतीसाठी तिच्या या प्रयत्नांना अनेकांकडून दाद मिळत आहे.
आपल्या सभोवताली असणार्या झाडांची माहिती प्रत्येकाला मिळावी, यासाठी आदिश्रीने खास क्यूआर कोड तयार केले आहेत. तिने हे क्यूआर कोड आजूबाजूच्या झाडांवर लावले आहेत. हे कोड मोबाइलवरील क्यूआर कोड स्कॅनरने स्कॅन करताच, त्या झाडाची संपूर्ण माहिती मोबाइलच्या स्क्रीनवर उमटते. त्यात झाडाचे मराठी, इंग्रजीसह अन्य भाषेतील नाव, शास्त्रीय नाव, झाडाचे कार्य, उपयुक्तता, मूळ स्थान, ते जगभरात कोठे कोठे आढळून येते, अशा सर्व माहितीचा समावेश आहे.
जंगलातील दुर्मीळ झाडे, शेतातील झाडे, फळझाडे, फुलझाडे, आयुर्वेदिक, औषधी वनस्पती, मसाल्याची झाडे, भाजीपाला अशा निरनिराळ्या झाडांची माहिती या उपक्रमातून मिळत आहे. दीडशेहून अधिक दुर्मीळ झाडांचे क्यूआर कोड तयार करणार्या आदिश्रीचे काम कौतुकास्पद असल्याचे मत पर्यावरण व संगणक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पाचवीत शिकणारी आदिश्री सामाजिक संदेश देण्यासाठी प्रयत्नशील असते. वयाच्या सहाव्या वर्षीच तिने पाणीबचतीसाठी 'माझ्या स्वप्नातील गाव' हे संकेतस्थळ तयार केले. आदर्श गाव कसे असावे, गावाच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, सामाजिक जबाबदारी काय, याविषयीची माहिती या संकेतस्थळावर असून, त्याला अनेक देशांतून भेटी देण्यात आल्या आहेत. आदिश्रीने वयाच्या सातव्या वर्षी पाण्यासाठी अॅण्ड्रॉइड अॅपचीही निर्मिती केली. तिला अभ्यासाबरोबरच अवकाशाविषयी वाचन, पियानो वाजवणे, स्केटिंग, पेंटिंग, लिखाण करणे, कथक नृत्य यांचीही आवड आहे.
क्यूआर कोडमुळे झाडांची माहिती मिळेल, त्यामुळे त्यांच्याशी आपली ओळख होईल आणि आपण त्यांची काळजी घ्यायला शिकू. झाडेही आपल्याशी बोलतील. प्रत्येकाने झाडे लावायलाच हवी.
– आदिश्री पगार, नाशिक