Mohammed Siraj : विराट; तू माझ्यासाठी नेहमीच ‘सुपरहिरो’, मोहम्मद सिराजची भावूक पोस्ट! | पुढारी

Mohammed Siraj : विराट; तू माझ्यासाठी नेहमीच ‘सुपरहिरो’, मोहम्मद सिराजची भावूक पोस्ट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर सर्व सहकारी खेळाडूंनी त्याच्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश लिहिले. यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (mohammed siraj) नावाचाही समावेश झाला आहे, ज्याने विराटसाठी खूप भावनिक पोस्ट लिहिली आहे. विराट हा माझ्यासाठी नेहमीच कर्णधार राहील असे त्याने म्हटले. या पोस्टला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

गेल्या वर्षी टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी सायंकाळी विराटने अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्याच्या या निर्णयानंतर संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला.

मोहम्मद सिराजने (mohammed siraj) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून विराट कोहलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने कोहलीविषयी त्याने एक अतिशय भावनिक संदेशही लिहिला आहे. या संदेशात सिराजने कोहलीचे वर्णन त्याचा मोठा भाऊ आणि सुपरहिरो असे केले आहे.

सिराज (mohammed siraj) पोस्टमध्ये म्हणतो, ‘माझ्या सुपरहिरोसाठी.. मला तुझ्याकडून मिळालेल्या समर्थन आणि प्रोत्साहनाबद्दल मी तुझे आभार मानू शकत नाही. तू माझ्यासाठी नेहमीच चांगला भाऊ आहेस, इतक्या वर्षात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या वाईटाकाळात तू नेहमी माझ्या सोबतीला राहिलास. तू नेहमीच माझा कर्णधार किंग कोहली राहशील.’

मोहम्मद सिराजच्या (mohammed siraj) कारकिर्दीवर विराट कोहलीचा खोलवर प्रभाव पडला आहे. विराटने सिराजला आयपीएलमध्ये आरसीबीकडून संधी दिली आणि त्याच्या गोलंदाजीवर विश्वास दाखवत नेहमी त्याची पाठराखण केली. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी प्रकारात यश मिळवण्यासाठी त्याला प्रोत्साहनही दिले. कोहलीनेही सिराजच्या क्षमतेचे कौतुक केले आणि यावरून दोन्ही खेळाडूंमधील संबंध स्पष्टपणे दिसून येतो.

दरम्यान, जसप्रीत बुमरानने मोहम्मद सिराजच्या फिटनेसबद्दल माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्यामुळे सिराजला एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर जाण्याचा धोका होता. त्यामुळे बीसीसीआयने नवदीप सैनीचा वनडे संघात समावेश केला होता. मात्र, सोमवारी वनडे संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने सिराज तंदुरुस्त असल्याचे सांगितले. तसेच तो एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसेल अशी आशा व्यक्त केली. बुमराह म्हणाला की, ‘मला वाटते की रिराज ठीक आहे. तो आमच्यासोबत सराव करत आहे. मला कोणतीही अडचण दिसत नाही. मला या क्षणी काहीही माहित नाही परंतु असे दिसते की सर्वजण ठीक आहेत.’

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पत्र लिहून सांगितले की, कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची योग्य वेळ आली आहे.

विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनी तसेच बीसीसीआयचे आभार मानले. त्याने टी-20 विश्वचषकापूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जेव्हा टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये वाईटरित्या पराभवाला सामोरे जावे लागले तेव्हा बीसीसीआयने त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकले.

वनडेच्या कर्णधारपदावरून हटल्यानंतर बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यातील वाद चांगलाच वाढला होता. कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराट जवळपास महिनाभर संघापासून दूर होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली. पण दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी त्याने सौरव गांगुली यांचे विधान फेटाळून लावत नवीन वादाला तोंड फोडले, ज्यात बीसीसीआय अध्यक्षांनी विराट कोहलीला टी-20 संघाचे कर्णधारपद न सोडण्यास सांगितले होते.

विराट कोहलीने हे वक्तव्य फेटाळून लावत गांगुलींनी असे काही म्हटले नसल्याचे सांगितले. त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबतही यापूर्वी माहिती देण्यात आली नव्हती. विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर वाद आणखी वाढला.

Back to top button