नाथाभाऊंचे डोके फिरले, देव त्यांना सद्बुद्धी देवो : महाजन | पुढारी

नाथाभाऊंचे डोके फिरले, देव त्यांना सद्बुद्धी देवो : महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

एकनाथ खडसे यांनी आपल्यावर सडक्या मनोवृत्तीतून टीका केली असून, त्यांचे डोके फिरले आहे. ईश्‍वर त्यांना सद्बुद्धी देवो, अशा शब्दांत भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘महाजन यांना पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने कोरोना झाला’ असा टोला खडसे यांनी लगावला होता. त्यावरून दोघांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे. खडसे यांनी ‘गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे लागेल’ असा टोला लगावला. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार महाजन म्हणाले की, खडसे यांनी टीका अत्यंत सडक्या मनोवृत्तीतून आली आहे. मी त्याबद्दल काही बोलणार नाही. कारण, ते माझे संस्कार नाहीत.

नाथाभाऊंनी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन व विकृतीचा कळस गाठून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा स्वभाव व आजवरचा लौकिक पाहता, त्यांच्याकडून आलेली ही प्रतिक्रिया आश्‍चर्यकारक नाही. त्यांचे विधान नैराश्यातून आले आहे. ते विकृती व नैराश्यातून लवकर बरे होवोत या अपेेक्षेने त्यांना ‘गेट वेल सून’ म्हणतो. सत्तेच्या लोभापोटी त्यांनी पक्षांतर केले. मात्र, तरी त्यांना आतापर्यंत काहीही मिळालेले नाही, असेही महाजन म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button