

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांच्या कोरोना चाचण्या करू नका, धोका नसेल तर त्यांच्या सहवासात आलेल्यांच्याही चाचण्या करू नका, अशा नव्या मार्गदर्शक सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सोमवारी जारी केल्या.
कुणाच्या चाचण्या करू नयेत असे सांगताना आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आयसीएमआरने म्हटले आहे की, सामुदायिक पातळीवर ज्या व्यक्तींना लक्षणे नाहीत त्यांच्या चाचण्या करू नयेत. वयोवृद्ध किंवा इतर आजार नसतील आणि अशी व्यक्ती रुग्ण संपर्कात आलेली असेल आणि लक्षणे नसतील तर अशा व्यक्तीचीही चाचणी केली जाऊ नये. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गृह विलगीकरणात राहिलेल्या रुग्णांच्याही विलगीकरण संपल्यानंतर चाचण्या करण्यात येऊ नयेत. सुधारित धोरणानुसार कोरोना काळजी केंद्रातून उपचार घेऊन, म्हणजेच बरे होऊन बाहेर पडणार्या रुग्णांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येऊ नयेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशांतर्गत आंतरराज्य प्रवास करणार्या प्रवाशांच्याही कोरोना चाचण्या करू नका, असे आयसीएमआरने स्पष्ट म्हटले आहे. आयसीएमआरच्या नव्या धोरणामुळे देशभरातील कोरोना चाचण्यांचे सत्रच आता थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक राज्यांनी धोकादायक किंवा कोरोनाग्रस्त राज्यांतून येणार्या नागरिकांना कोरोना चाचणीची सक्ती केलेली आहे. तीसुद्धा आता करता येणार नाही.
विशेष म्हणजे कार्यालयात किंवा घरात एक जरी कोरोना रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कातील सर्वच जण कोरोना चाचण्यांसाठी रांग लावत आणि लक्षणे असोत किंवा नसोत पॉझिटिव्ह आला की एक तर गृह विलगीकरणात किंवा कोरोना केंद्रांत दाखल होत असत. आता लक्षणे नसतील तर चाचणीच होणार नाही. परिणामी, संसर्ग झाला असेल आणि तुम्हाला कोणतेही लक्षण नसेल तर कोरोनाचे रुग्ण म्हणून तुम्ही घोषित होणार नाही. ओघानेच कोरोनाचे रुग्ण असूनही तुम्ही बिनदिक्कत सर्व व्यवहार करू शकाल.
चाचण्या कुणाच्या?
ज्या रुग्णांना खोकला, ताप, घसा दुखणे, खवखवणे, तोंडाची चव जाणे, वास येणे बंद होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास कमी पडणे अशी लक्षणे असतील तर अशाच रुग्णांच्या चाचण्या करा, असे आयसीएमआरने म्हटले आहे. या रुग्णांच्या सहवासात आलेले वयोवृद्ध असतील आणि त्यांना मधुमेह, हायपरटेन्शन, फुप्फुस किंवा किडनीचे विकार, गाठींचे आजार आणि लठ्ठपणा असेल तर अशाच सहवासितांना धोका संभवतो. त्यामुळे त्यांच्याच चाचण्या करण्यात याव्यात. आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्या व्यक्तींच्याही चाचण्या करणे आवश्यक असून, भारतीय विमानतळावर विदेशातून येणार्या प्रवाशांच्याही चाचण्या करण्यात याव्यात, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
राज्यातील 85% रुग्ण लक्षणेविरहित
राज्यात सध्या कोरोनाचे 2 लाख 2 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील तब्बल 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. सक्रिय रुग्णांपैकी तब्बल 1 लाख 74 हजार 399 (87 टक्के) रुग्ण मुंबई, ठाणे व पुणे या तीन जिल्ह्यांतील आहेत. केवळ 27 हजार 227 (13.7 टक्के) रुग्ण उपचार घेत आहेत. 21 हजार 816 (11 टक्के) रुग्णांना सौम्य, तर काहींना कोणतीही लक्षणे नसतानाही केवळ खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यभर सर्वत्र क्वारंटाईनचा कालावधी सात दिवसांचाच असणार आहे.
राज्यात सध्या केवळ 3 हजार 699 (1.7 टक्के) कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 1 हजार 711 (0.85 टक्के) रुग्ण गंभीर आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. रोज 2,100 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. दररोज सरासरी 500 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यातही 300 मे. टन सामान्य रुग्णांना, तर 200 मेट्रिक टन कोरोनाबाधितांसाठी वापर होत आहे.
राज्यात तिसरी लाट 20 डिसेंबरपासून सुरू झाल्याचे टोपे यांनी सांगितले. गेल्या 20 दिवसांत राज्यात 2 लाख 70 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. 20 डिसेंबर रोजी राज्यात 7 हजार, तर मुंबईत 2 हजार सक्रिय रुग्ण होते. त्यानंतर वीस दिवसांनी म्हणजेच 9 जानेवारी रोजी राज्यात 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण होते. यात मुंबई शहरात 1 लाख 17 हजार 437 रुग्ण, ठाणे जिल्ह्यात 38 हजार 105, तर पुणे जिल्ह्यात 18 हजार 857 रुग्णांचा समावेश आहे.
राज्यातील एकूण 87 टक्के रुग्ण राज्यातील या तीन प्रमुख शहरांतील आहेत. तर उर्वरित 13 टक्के रुग्ण राज्यातील विविध भागांतील आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे आलेली तिसरी लाट अद्याप तरी मुंबई परिसर व पुण्यापुरतीच मर्यादित असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.
लहान मुले ओमायक्रॉन संसर्गापासूनही दूर
पहिल्या आणि दुसर्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण सरासरी 10 टक्क्यांपेक्षाही अधिक होते. आता तिसर्या लाटेदरम्यान ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा सहापट अधिक वेगाने प्रसार करतानाही 0 ते 19 वयोगटातील मुले बाधित होण्याचे प्रमाण सरासरी दहा टक्क्यांच्या आसपासच आहे. 19 डिसेंबर ते 7 जानेवारी या 19 दिवसांत कोरोना बाधा झालेल्या 0 ते 10 वयोगटातील 4 टक्के, तर 11 ते 20 वयोगटातील 7 टक्के मुलांचा समावेश आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संसर्गापासून लहान मुले दूर असल्याचे दिसून येते.
10 वर्षांखालील केवळ 3.18 टक्के मुलांना, तर 10 ते 20 वयोगटातील 7.47 टक्के मुलांना आजवर कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील आजवर आढळलेल्या 69 लाख 20 हजार कोरोनाबाधित रुग्णांपैकी 7 लाख 40 हजार (10.65 टक्के) 0 ते 20 वयोगटातील मुला-मुलींचा समावेश आहे.
700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासल्यास लॉकडाऊन
राज्यात आताच्या घडीला केवळ 5 हजार 400 कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहेत. यात 3 हजार 699 जणांना ऑक्सिजन, तर 1 हजार 711 रुग्णांना आयसीयू, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ज्या दिवशी राज्याला 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावला जाईल, असे अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
होम आयसोलेशनसाठी हेल्थ किट
होम आयसोलेशन असणार्यांसाठी हेल्थ किट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या किटमध्ये सॅनिटायझर, 10 मास्क, 10 पॅरासिटामॉल गोळ्या, 20 मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. कॉल सेंटरवरून रुग्णाला कॉल केला जाणार आहे. त्याची विचारपूस या कॉलवरून केली जाणार आहे.