मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, माहीममध्ये येऊन भाजप नेते प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहेत.
शिवसेना भवन हे आमचे मंदिर आहे. भाजपचे नेते याआधीही सेनाभवनावर येऊन भुंकले होते. शिवसैनिक कट्टर असून त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. शिवसेना भवन फोडायचे सोडाच शिवसेना भवनाच्या फुटपाथवर तर येऊन बघा, तंगड्या तोडून हातात देऊ, असा दमच शिवसेना नेत्यांनी भाजपला भरला.
भाजपच्या दादर येथील कार्यालयाचे आमदार नितेश राणे व प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी लाड व राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान 5 नगरसेवक निवडून आणणार, किल्ला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असे लाड यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेला ताकद देण्याचे काम आम्ही केले. आता त्यांची ताकद तोडायचे काम आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेला वाटते की, आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू, पण त्यांना सांगतो की, वेळ आली तर आम्ही सेनाभवनही फोडू, असे
चिथावणीखोर वक्तव्य लाड यांनी यावेळी केले.
शिवसेनेकडून आक्रमक प्रत्युत्तराचा प्रसाद मिळताच लाड यांनी रात्री उशिरा सारवासारव करीत दिलगिरी व्यक्त केली. आम्ही माहीममध्ये आलो की जणू सेना भवन फोडायला आलो आहोत असा बंदोबस्त लावला जातो.
या माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेल्या वास्तूचा मला अनादर करायचा नव्हता. तरी माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
शिवसेनेवर उठसूट भुंकण्यासाठी भाजपने काही लोकांना ठेवलेले आहे. प्रसाद लाड आणि राणे कंपनी हे त्यातलेच. भाजपच्या या असल्या लोकांना वठणीवर आणण्यास शिवसेनेची रणरागिणी महिला आघाडी सक्षम आहे.शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांसाठी मंदिर आहे.आमच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर अशा लोकांच्या तंगड्या तोडून हाती देऊ. त्यासाठी आदेशाची वाट पाहणार नाही.
– मनीषा कायंदे, शिवसेना आमदार व प्रवक्ता
मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचे नाव लिहिलेले नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडले असेल तर बिघडले कुठे, असा सवाल करत बाळासाहेबांचे शिवसेना भवन आता राहिले नाही.
आताचे शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
या टीकेला प्रत्युत्तर देत शिवसेना आमदार सदा सरवणकर म्हणाले, भाजपने महापालिकेतील सत्तेचे स्वप्न बघू नये, शिवसेना भवन व शिवसेनेची प्रत्येक शाखा शिवसैनिकांचे मंदिर आहे.
भाजपानेही शाखेच्या माध्यमातून समाज सेवाच करावी. दादरमधील लोकांना समाजसेवेची गरज आहे, युद्धाची नाही.
100 कार्यालय उघडली तरी शिवसेनेला फरक नाही कोण प्रसाद लाड? त्यांना माहीत नाही का शिवसेना भवनवर आधी कोणाला किती प्रसाद मिळाला ते? शिवसेना भवनाच्या फुटपाथवर येऊन दाखवा त्यांना शिवसेना स्टाईल उत्तर देऊ.
बाळासाहेबांचा शिवसैनिक आजही सेनाभवनला आपल्या हृदयात ठेवतो. माहीम, दक्षिण मुंबईत शिवसेना काय आहे हे विरोधकांना माहिती आहे अशी 100 कार्यालय खोलली तरी शिवसेनेला फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.
हे ही वाचलं का?