निर्बंध शिथिल होण्याची मुंबई, ठाण्याला प्रतीक्षा
मुंबई/कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोरोना निर्बंधांच्या तिसर्या टप्प्यात असलेल्या 11 जिल्ह्यांना लवकरच काहीशी निर्बंध शिथिल ता मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, शिथिलतेसंबंधात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसर्या श्रेणीत येणार्या शहरांमध्ये निर्बंध कायम ठेवण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. या श्रेणीत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसह कोकणचेही जिल्हे येतात.
प्रत्येक जिल्ह्याची कोरोना स्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्या-त्या जिल्हाधिकार्यांनी रुग्णस्थिती पाहून बाजारपेठा उघडण्यासंदर्भात आणि दुकानांच्या वेळा ठरवण्याबद्दल स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
शनिवारी दुकाने सुरू राहणार
मुंबई, ठाण्यासह 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स सुरू ठेवण्यास रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी मिळू शकते. सध्या शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद असतात. आता या 25 जिल्ह्यांत शनिवारीही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळू शकते.
लग्न समारंभासाठी 100 लोकांना उपस्थित राहता येईल. खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थितीला परवानगी, नाटक, सिनेमागृहांमध्ये 50 टक्के उपस्थिती, थिएटर व व्यायामशाळांना निर्बंधांतून काही प्रमाणात सूट मिळू शकते. या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जाहीर होणार आहे.
संसर्ग दर 10% पेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यांत निर्बंध कडक करा!
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशभरातील 46 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग दर 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे तेथे निर्बंध कडक करा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह 10 राज्यांना दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, ताळमळनाडू, ओरिसा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणीपूर या राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या राज्यांमध्ये रोज नवे रुग्ण वाढत आहेत किंवा तेथील संसर्ग दर वाढता आहे.
गेल्या काही आठवड्यांत 10 टक्क्यांपेक्षा अधिक संसर्ग दर असलेल्या 46 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्याची गरज असून, तेथे ढिलाई झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय 53 जिल्ह्यांतील संसर्ग दरदेखील 5 ते 10 टक्केदरम्यान असून, तेथे चाचण्या वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या 10 राज्यांनी जिल्हानिहाय सेरो सर्व्हे करून आढावा घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
देशभरात रोज 40 हजारांवर नवे रुग्ण आढळत असल्यामुळे कुठेही ढिसाळपणा महागात पडू शकतो, असा इशाराही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. विशेषत: कोरोनाच्या मृत्यूचे 80 टक्के प्रमाण हे 45 ते 60 आणि 60 पुढील वयोगटात असून, या वयोगटात लसीकरण वाढवा, असेही केंद्राने म्हटले आहे.