

Mayor Reservation Lottery Sparks Clash: राज्यातील महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होत असताना आज मंत्रालयात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाने आरक्षण सोडत प्रक्रियेवर बहिष्कार टाकला असून, यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला.
आरक्षण सोडत सुरू असतानाच ठाकरे गटाकडून काही मुद्द्यांवर हरकत घेण्यात आली. त्यानंतर भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. अखेरीस ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी बाहेर पडले आणि त्यांनी सोडतीचा निषेध करत बहिष्कार जाहीर केला.
किशोरी पेडणेकर यांनी विशेषतः मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदवला.
त्या म्हणाल्या की, “याआधीही दोन वेळा आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गात होतं. मग त्या वेळी ते ओबीसीमध्ये का टाकलं नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय झाल्याचा आरोप केला.
या वादानंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं की, ठाकरे गटाकडून आलेल्या तक्रारी आणि आक्षेपांची नोंद घेतली जाईल आणि त्याबाबत पुढील प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, आजच्या आरक्षण सोडतीमध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गाचं (महिला) आरक्षण निघालं आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय हालचाली आणखी वेगाने सुरू झाल्याचं चित्र आहे.
आरक्षण प्रक्रियेमुळे राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महिला महापौरांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः काही ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर निवडली जाण्याची शक्यता आहे.