Sooraj Pancholi: 'दिशा आणि आदित्य ठाकरेंना...', दिशा सालियन प्रकरणावर सूरज पांचोलीच्या नव्या खुलाशाने खळबळ, काय म्हणाला?

Sooraj Pancholi Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर अभिनेता सूरज पांचोलीने मोठं वक्तव्य केलं आहे.
Sooraj Pancholi Disha Salian Case Aaditya Thackeray
Sooraj Pancholi Disha Salian Case Aaditya ThackerayPudhari
Published on
Updated on

Sooraj Pancholi Disha Salian Case Aaditya Thackeray: दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली आहे. सूरजने दिशा सालियन आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांना आपण आयुष्यात कधीही भेटलो नसल्याचा दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाशी आपलं नाव जोडलं जात असल्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर मोठा परिणाम झाल्याचंही त्याने म्हटलं आहे.

सूरज पांचोलीने इन्स्टाग्रामवर सहा स्लाइड्सची पोस्ट शेअर करत तपास यंत्रणांनी या प्रकरणाची “पूर्णपणे, सखोल आणि कोणताही उशीर न करता चौकशी करावी”, अशी मागणी केली आहे. तपासात आपला सहभाग असल्याचा कोणताही पुरावा समोर आल्यास कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

“मी दिशा सालियन किंवा आदित्य ठाकरेंना कधीच भेटलो नाही”

आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच सूरजने दिशा सालियन आणि आदित्य ठाकरे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला.

“मी दिवंगत दिशा सालियन किंवा आदित्य ठाकरेंना माझ्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाही. एकदाही नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणेही नाही,” असं सूरजने म्हटलं.

गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर आपल्याबद्दल वेगवेगळे आरोप केले जात असल्याचं त्याने सांगितलं. या काळात आपल्याला शिवीगाळ करण्यात आली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्याचा दावा सूरजने केला.

“मी घाबरलेलो नाही,” असंही त्याने स्पष्ट केलं.

या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपलं नाव वारंवार त्यात ओढलं गेलं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष वाया गेल्याचं सूरजने म्हटलं. आता वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं.

“माझे कोणतेही राजकीय संबंध नाहीत”

दिशा सालियन प्रकरणातील राजकीय चर्चेवरही सूरजने भाष्य केलं आहे. आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींशी असलेल्या वादामुळे आपल्यावर टीका केली जात असल्याचा दावा त्याने केला.

“तुमचे काहीही प्रश्न असतील, पण त्याची शिक्षा मला देऊ नका,” असं सूरजने म्हटलं.

आपला कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. कोणाशी वैयक्तिक वैर नाही. कोणतेही राजकीय संबंध नाहीत. कोणाचं संरक्षण करण्याची किंवा कोणावर हल्ला करण्याची आपली इच्छा नाही, असं त्याने सांगितलं.

Sooraj Pancholi Disha Salian Case Aaditya Thackeray
CJP Protest: राजकीय वातावरण तापलं! राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन; SIR थांबवण्यासह 3 मोठ्या मागण्या, ‘जंतर-मंतर 2.0’चीही घोषणा

“पुरावा मिळाला तर कायद्याने होणारी शिक्षा भोगेन”

सूरजने तपास यंत्रणांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे.

आपल्याविरोधात या प्रकरणाशी संबंधित “एक छोटासा पुरावाही” समोर आला आणि आपला सहभाग सिद्ध झाला, तर कायदा ठरवेल ती शिक्षा भोगण्यास आपण तयार असल्याचं त्याने म्हटलं.

मात्र, तपासात आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं, तर तपास यंत्रणा आणि माध्यमांनीही ते तितक्याच स्पष्टपणे जनतेसमोर सांगावं, अशी मागणी सूरजने केली.

“मला सहानुभूती नको, पारदर्शकता हवी”

माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चेवरही सूरजने नाराजी व्यक्त केली.

“मी कोणाची सहानुभूती मागत नाही. माझी बाजू घ्या, असंही म्हणत नाही. मला फक्त पारदर्शकता हवी आहे. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही,” अशी भूमिका त्याने मांडली.

तपास यंत्रणांना आपण सहकार्य केलं आहे. आवश्यक तेव्हा प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि चौकशीसाठी उपलब्ध राहिलो आहे, असंही सूरजने सांगितलं.

मात्र, आपला कोणताही संबंध नसलेल्या प्रकरणामुळे आयुष्यातील आणखी काही वर्षे गमवावी लागू नयेत, अशी चिंता त्याने व्यक्त केली.

Sooraj Pancholi Disha Salian Case Aaditya Thackeray
Hiring Controversy: 'या' चार राज्यातील कर्मचाऱ्यांना नोकरी देणार नाही; उद्योजकाचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर संताप, काय आहे प्रकरण?

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची तयारी

योग्य व्यासपीठ मिळाल्यास या प्रकरणावर सविस्तर मुलाखत देण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. समोरासमोर बसून पत्रकाराने कठीण आणि अस्वस्थ करणारे प्रश्न विचारावेत, मात्र ते तथ्यांच्या आधारे आणि संयमाने विचारले जावेत, अशी त्याची अपेक्षा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून काही गोष्टींबाबत आपण मौन बाळगलं आहे. काही गोष्टी गृहीत धरल्या गेल्या, काही बातम्यांमध्ये आल्या, तर काही प्रश्न आपल्याला थेट विचारलेच गेले नाहीत, असं सूरजने म्हटलं. योग्य संधी मिळाल्यावर “प्रत्येक प्रश्नाचं थेट आणि प्रामाणिकपणे उत्तर देईन”, असं त्याने स्पष्ट केलं.

दिशा सालियन प्रकरणाचा तपास सध्या कुठे आहे?

दिशा सालियनचा जून 2020 मध्ये मुंबईतील एका निवासी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये तपास बंद केला होता. त्यावेळी पोलिसांनी या मृत्यूमागे घातपाताचा पुरावा नसल्याचं आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूशी संबंध नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर विशेष तपास पथकानेही या प्रकरणाचा आढावा घेतला होता.

मात्र, या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं असून सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या आरोपांचा समावेश आहे. दिशा यांच्या मृत्यूची परिस्थिती तसेच यापूर्वी झालेल्या पोलिस, वैद्यकीय आणि फॉरेन्सिक प्रक्रियेबाबतही आरोप करण्यात आले आहेत.

हे आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत आणि सध्या ते तपासाचा विषय आहेत. या टप्प्यावर कोणालाही आरोपी मानू नये, जोपर्यंत तपासात त्यांच्याविरोधात पुरेसा पुरावा समोर येत नाही, अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही दिशा सालियन यांना आपण ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news