

Disha Salian Case: दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले आहे. याच प्रकरणातील नोटीस देण्यासाठी सतीश सालियान वकिलांच्या पथकासह मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पोहोचले.
सतीश सालियान आणि त्यांच्या वकिलांची टीम मातोश्रीच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात शिवसैनिकांचीही मोठी गर्दी झाली होती. प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने काही काळ परिस्थिती गोंधळाची झाली. मात्र, अखेर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी अब्रुनुकसानीच्या दाव्याशी संबंधित कागदपत्रे स्वीकारल्याची माहिती सतीश सालियान यांनी दिली.
सतीश सालियान आपल्या वकिलांसह मातोश्री परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक परिसरात उपस्थित होते. नोटीस प्रत्यक्ष देण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे सालियान यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
काही वेळानंतर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी नोटीस स्वीकारल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नोटीस देण्यासाठी प्रत्यक्ष मातोश्रीपर्यंत जाण्याचा उद्देश पूर्ण झाल्याचे सालियान यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.
माध्यमांशी बोलताना सतीश सालियान यांनी गंभीर आरोप केले. मातोश्रीबाहेर येऊ नका, अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आपल्याला पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दिशा सालियान प्रकरणाच्या तपासाबाबतही त्यांनी भाष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाच्या तपासात यापूर्वी चुकीच्या पद्धतीने गोष्टी मांडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांचा आरोप आहे. आता तपास पुन्हा सुरू झाल्याने सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सतीश सालियान यांनी यावेळी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. तपासाला उशीर झाला असला तरी आता पुढील प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करत त्यांनी ‘कॉमन मॅनची ताकद दाखवू’, असा इशाराही दिला.
दरम्यान, या प्रकरणात विविध दावे आणि आरोप होत असल्याने त्यातील प्रत्येक दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी होणे महत्त्वाचे आहे. न्यायालयीन आणि तपास यंत्रणांच्या प्रक्रियेतूनच आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे.
सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनीही माध्यमांशी बोलताना या संपूर्ण घडामोडीबाबत माहिती दिली. नोटीस देण्यासाठी प्रत्यक्ष मातोश्रीवर जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत त्यांनी सांगितले की, त्यांना धमक्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ‘येऊन दाखवा’, ‘नोटीस देऊ देणार नाही’, अशा प्रकारची वक्तव्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील एका व्हिडीओचा पुरावा सीबीआयकडे सादर केल्याचाही दावा ओझा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्हिडीओ तपास यंत्रणेला देण्यात आला असून त्याच्या आधारे पुढील तपास होईल.
तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास सुरू असल्याचे आणि सर्वोच्च न्यायालयासमोरही संबंधित माहिती सादर केल्याचे ओझा यांनी सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेतून न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या काही वर्षांपासून राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.