

Bengaluru Hiring Controversy: बंगळुरूमधील A1 Sports World या कंपनीचे संस्थापक कार्तिक एसजी यांनी केलेल्या एका घोषणेमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. कंपनी आता उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील पुरुष उमेदवारांना नोकरी देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या निर्णयावरून कार्तिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
कार्तिक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत कंपनीच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या टीममध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. एका माजी कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाच्या घटनेनंतर महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.
कार्तिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, या चार राज्यांमधून येणाऱ्या पुरुष उमेदवारांना कंपनीत भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या राज्यांतील महिला उमेदवारांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
मात्र, हा निर्णय सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक यूजर्सनी कंपनीवर प्रादेशिक भेदभावाचा आरोप केला. काही उद्योजक आणि CEO यांनीही कार्तिक यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.
उद्योजक आदित्य आर्या यांनी या निर्णयावर टीका केली. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची क्षमता आणि चारित्र्य पाहून भरती करणे अपेक्षित आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या वर्तनावरून संपूर्ण राज्यातील उमेदवारांना नोकरीपासून दूर ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
आर्या यांनी X वर प्रतिक्रिया देताना सांगितले की, उमेदवारांची क्षमता आणि चारित्र्य तपासण्याऐवजी संपूर्ण राज्यांनाच ‘ब्लॅकलिस्ट’ करणे हे कंपनीच्या भरती प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण करणारे आहे.
कार्तिक यांनी नंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया देत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी कंपनीतील एका पुरुष कर्मचाऱ्यावर गंभीर गैरवर्तनाचे आरोप झाले होते.
कार्तिक यांच्या दाव्यानुसार, संबंधित कर्मचारी या चार राज्यांपैकी एका राज्यातून होता. महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांनंतर त्याला दोन वेळा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचा दावा कार्तिक यांनी केला.
त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आल्याचे कार्तिक यांनी स्पष्ट केले.
कार्तिक यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना, अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या व्यक्तींना संधी द्यावी का, असा सवालही उपस्थित केला.
दरम्यान, कंपनीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर मतभेद व्यक्त होत आहेत. काही यूजर्सनी ऑफिसमधील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे एखाद्या व्यक्तीच्या गैरवर्तनासाठी संपूर्ण राज्यातील पुरुष उमेदवारांना जबाबदार धरणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्तिक यांच्या घोषणेने सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्या कंपनीच्या या भरती धोरणाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.