Mumbai Protest: मुंबईतील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तन; व्हायरल व्हिडिओवरून राजकीय वाद, पोलिसांचे स्पष्टीकरण

Mumbai Protest Viral Video: मुंबईतील आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसावर महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला.
Mumbai Protest Viral Video
Mumbai Protest Viral VideoPudhari
Published on
Updated on

Mumbai Protest Viral Video: मुंबईतील एका विद्यार्थी आंदोलनादरम्यान समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये साध्या वेशातील एका पोलिसाने महिला आंदोलकाला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त करत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी हे आरोप फेटाळत व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

जंतर-मंतर आंदोलनाची धग मुंबईत

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटत असून विविध ठिकाणी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांकडून निदर्शने केली जात आहेत. याचदरम्यान मुंबईतील एका आंदोलनावेळी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

सुप्रिया सुळे यांची कारवाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ शेअर करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी म्हटले की, आंदोलनकर्ते हे गुन्हेगार नसून लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कोणालाही संरक्षण मिळता कामा नये आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

वर्षा गायकवाड यांचा सवाल

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केले. महिला आंदोलकाला ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांची नियुक्ती का करण्यात आली नाही? संबंधित पोलिसावर कोणती कारवाई होणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी

आमदार रोहित पवार यांनीही व्हिडिओवर प्रतिक्रिया देत संबंधित व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्यास त्याला तात्काळ निलंबित करून पोलीस दलातून बडतर्फ करावे आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेला "पोलिसी अतिरेक" असे संबोधत सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, असे म्हटले.

सरकारकडून कारवाईचे संकेत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिल्याचे सांगितले.

Mumbai Protest Viral Video
Abhijit Dipka CJP Protest: चर्चेत फक्त राजीनामाच... आम्हाला अटक करण्याचं षडयंत्र; देशाच्या नुकासानीवरून काय म्हणाले दिपके?

मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

दरम्यान, मुंबई पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया देत व्हिडिओमधील आरोप नाकारले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेत होते. त्या वेळी महिला आंदोलक अचानक मध्ये आल्याने व्हिडिओमध्ये वेगळे चित्र दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व बाबींची पडताळणी केल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai Protest Viral Video
Rahul Gandhi: 'धर्मेंद्र प्रधानांना हटवा', PM मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधी आक्रमक; सरकारसमोर ठेवल्या 3 मागण्या

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असला, तरी नेमकी घटना काय घडली याबाबत वेगवेगळे दावे समोर आले आहेत. त्यामुळे अधिकृत चौकशी आणि संबंधित यंत्रणांच्या निष्कर्षानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news