

Dia Mirza On PM Modi: NEET पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून व्हिडिओ शेअर केल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्त्या दिया मिर्झा यांनीही सोशल मीडियावरून पंतप्रधानांच्या व्हिडिओवर टीका केली आहे.
दिया मिर्झा यांनी सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, ज्या पालकांनी आपल्या मुलांना गमावले, ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांचे धैर्य आणि अनेक आठवडे उपोषण करणारे सोनम वांगचुक व इतर विद्यार्थ्यांबद्दल पंतप्रधानांच्या संदेशात सहानुभूतीचा एक शब्दही नव्हता.
दिया मिर्झा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "सर, एवढं करणं इतकं कठीण होतं का? तुम्हाला बोलण्यासाठी तब्बल 47 दिवस लागले. आणि आता बोललात, तरी लाखो तुटलेल्या मनांना दिलासा मिळेल असं एकही वाक्य तुम्ही बोलला नाही." त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्या मताला समर्थन दिले, तर काहींनी विरोधही दर्शवला.
NEET पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न यामुळे हा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. या आंदोलनादरम्यान शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उपोषण केले होते. त्यानंतर केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
पंतप्रधानांच्या व्हिडिओनंतर विरोधी पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि काही सेलिब्रिटींकडून प्रतिक्रिया येत आहेत. NEET प्रकरणावर सरकारने अधिक ठोस पावले उचलावीत आणि विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.