

मुंबई : राजेश सावंत
मुंबई महापौर पदासाठी 28 जानेवारीला निवडणूक घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला लागल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी 19 जानेवारीला राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. महापौर निवडणुकीची ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नवनियुक्त नगरसेवकांना सभेची आगावू माहिती देण्यासाठी सचिव विभागाची तयारी सुरू आहे. त्यामुळे 26 जानेवारीला महापौरांच्या हस्ते झेंडावंदन होणे अशक्य आहे.
महापालिका निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा एक गट स्थापन करून, प्रत्येक राजकीय पक्षाच्या गटनेत्याची नियुक्ती करणे, व या गटाची नोंदणी कोकण आयुक्त कार्यालयात करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असतो. परंतु राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यानंतर 23 जानेवारीपूर्वी नगरसेवकांची यादी सचिव विभागात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे सचिव विभागामार्फत महापालिकेची पहिली सभा 28 जानेवारीला ठेवण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पहिल्या सभागृहाच्या बैठकीत सुरुवातीला महापौर निवडणूक प्रक्रिया पार पडेल. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त बसणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर उपमहापौर पदासाठी पीठासन अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पडतील. उपमहापौर यांच्या निवडीनंतर स्थायी व शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विविध पक्षांकडून आलेल्या पत्रानुसार सदस्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. यावेळी अन्य समित्यांच्या सदस्य पदाची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहिल्या सभागृहाची बैठक तहकूब करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक 2 फेब्रुवारीला घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी 30 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या निवडणुकीनंतर सुधार, बेस्ट, अन्य विशेष समिती व प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महापौर व उपमहापौर पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पार पाडणार आहेत.
2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्षांकडे महापालिका आयुक्त भूषण गगराणी सादर करणार आहेत. तब्बल तीन वर्षानंतर स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे. स्थायी समितीत या अर्थसंकल्पावर चर्चा होऊन, त्याला मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे.