

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो 8 मार्गिकेसाठी काढण्यात आलेल्या आर्थिक सल्लागार निविदेला क्रिसिल, मोनार्क सर्वेयर्स, निप्पॉन केओईआय, आरआयटीईएस, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स या 5 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. आचारसंहिता संपताच आर्थिक निविदाही खुली केली जाईल.
मेट्रो 8 मार्गिकेच्या अंतिम आराखड्यानुसार या मार्गिकेवर एकूण 20 स्थानके असून त्यापैकी 11 स्थानके नवी मुंबईत आहेत. वाशी खाडी पूल ओलांडल्यानंतर मानखुर्दपासून ही मेट्रो शीव-पनवेल महामार्गाला समांतर चालेल.
त्यानंतर नेरूळ, सीवूड्स, उरण या मार्गाने नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचेल. मेट्रो 8 ही सोनेरी मार्गिका 34.89 किमी लांबीची असून 14 स्थानके उन्नत आणि 6 स्थानके भूमिगत आहेत. या मार्गिकेमुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर केवळ 40 ते 45 मिनिटांत पार करता येणे शक्य होणार आहे. सध्या हे अंतर रस्तेमार्गे पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.