

डोंबिवली : लोकांनी ज्यांचा यापूर्वी बँड वाजवला तेव्हा त्यांना ब्रँड आठवला, अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केली. कल्याण पूर्वेत झालेल्या महायुती उमेदवारांच्या विजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत राज्यातील महत्वाकांक्षी तसेच कल्याण-डोंबिवलीतील मेगा प्रोजेक्टची यादीच वाचून दाखवली.
शिवसेना आणि भाजपा महायुतीचे कल्याण-डोंबिवलीमध्ये 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून तो धागा पकडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत तुम्हाला उमेदवार मिळत नाही त्यात आमचा काय दोष आहे ? असा खडा सवाल विरोधकांना उपस्थित केला. तर कल्याण-डोंबिवली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. तुम्ही डॉ. श्रीकांत शिंदे यांना एकदा नाही तर तीन वेळा निवडून दिले आहे.
केंद्रात महायुती, राज्यामध्ये महायुती असून महापालिकेतही महायुतीचे सरकार पाहिजे. जेणेकरून एकविचाराने विकासकामे होतील. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीमध्ये तर विकासकामांचा महामेरू उभा राहिला असल्याचे सांगत डॉ. श्रीकांत शिंदे हे एक व्हिजनरी नेतृत्व असल्याचे कौतुकोद्गारही त्यांनी यावेळी काढले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर बसेल, अशी जाहीर ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
काही लोक समजतात की आम्ही मालक आणि जनता नोकर, मात्र जनता जनार्दन हा सगळ्यात मोठा असून ते अशा प्रवृत्तीच्या लोकांना कायमस्वरूपी घरी पाठवतात हे आपण पाहिले असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दुश्मन कपटी आहे, दगाबाज आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मात्र एवढे काम केले आहे की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण आणि कमळ दिसून येणार असा ठाम विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.