

पनवेल : विक्रम बाबर
खारघर प्रभाग क्र पाच मधील प्रभाग रॅली दरम्यान निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना ९ जानेवारी रोजी पुन्हा खारघरमध्ये निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथकावर झालेल्या गैरवर्तना मुळे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हिरानंदानी परिसरात नेमणूक असलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकावर तपासणीदरम्यान शिवीगाळ करण्यात आली असून चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याची तोडफोड केल्याची गंभीर घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात संबंधित मुलीवर भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी हिरानंदानी परिसरात जनार्दन पोपट सरडे आणि त्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. सायंकाळी सहानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना सुमारे ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पांढऱ्या रंगाची एर्टिगा कार (एमएच ४६ बीक्यू ७५७९) या ठिकाणी आली. वाहन संशयास्पद वाटल्याने पथकाने तपासणीसाठी गाडी थांबवली आणि नियमाप्रमाणे तपासणी सुरू केली. या वेळी चित्रीकरणासाठी उपस्थित असलेले पियाशू पांडे यांना तपासणीचे चित्रिकरण करण्याचे आदेश देण्यात आले.
तपासणी सुरू असतानाच गाडीतून उतरलेल्या एका महिलेने अचानक आक्रमक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुमची लायकी आहे का आमची गाडी तपासण्याची” अशा शब्दांत वाद घालत तिने चित्रीकरण सुरू असलेल्या पांडे यांच्या हातातील कॅमेरा ओढून घेतला आणि रस्त्यावर आपटला. या प्रकारात कॅमेऱ्याची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली असून कॅमेरा फुटल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर तत्काळ उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या महिलेला ताब्यात घेत खारघर पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी केली. चौकशीत संबंधित महिलेचे नाव मनाली नामदेव ठाकूर (वय २५) असे निष्पन्न झाले. तिच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम १३२, २२१, ३२४(४), ३५२ आणि ३५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि शासकीय साधनसामग्रीचे नुकसान करणे या स्वरूपाचे आरोप या प्रकरणात नोंदवण्यात आले आहेत.
या घटनेमुळे खारघरमध्ये निवडणूक काळातील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात ५ जानेवारी रोजी देखील याच परिसरात निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून कॅमेऱ्याचे नुकसान करण्यात आले होते. मात्र त्या वेळी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर टीका झाली होती. आता मात्र गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याने “एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा” असा वेगळा निकष का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भयपणे आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी नेमलेल्या पथकांवर अशा प्रकारचे हल्ले होणे ही गंभीर बाब मानली जात असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कारवाई आणि प्रभावी पोलीस बंदोबस्ताची गरज व्यक्त केली जात आहे. खारघर पोलिस पुढील तपास करत असून घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.