

Mumbai Local News: मुंबई उपनगरीय रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व महिला डब्यांमध्ये 'इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टीम' शंभर टक्के कार्यान्वित केली आहे. यासोबतच महिला डब्यांमध्ये 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी महिला प्रवाशांना थेट मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधता येणार असून, रेल्वे प्रशासनाला तात्काळ मदत पुरविणे शक्य होणार आहे.
एकाही महिला डब्यात हे काम प्रलंबित नसल्याने या उपक्रमाची शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे. याशिवाय, महिला सुरक्षेच्या दृष्टीने सर्व 794 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या एकूण 1,974 डब्यांपैकी 888 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. यामध्ये 794 महिला डबे आणि 94 सामान्य डब्यांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने चालकांच्या केबिनमधील सुरक्षेवरही भर दिला आहे. महिला डब्यांतील इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टीममुळे छेडछाड, वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर कोणत्याही संकटाच्या वेळी प्रवाशांना थेट मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधता येणार आहे. यामुळे मदतकार्याचा प्रतिसाद वेळ कमी होऊन महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
इमर्जन्सी टॉकबॅक, सीसीटीव्ही आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे महिला प्रवाशांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. मात्र, या यंत्रणांचा प्रत्यक्षात किती प्रभावी वापर होतो, हे येणारा काळच ठरवणार आहे.