

Mumbai Local Fight Video
मुंबई: मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये बुधवारी मध्यरात्री जागेच्या किरकोळ वादातून एका प्रवाशावर तीघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात मध्यरात्री १२:१० च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर तीनही आरोपी ठाकुर्ली स्थानकात उतरून फरार झाले असून रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जागेचा वाद अन् थेट कोयत्याने वार
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने धावणाऱ्या लोकलच्या डब्यात दोन प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून किरकोळ वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, लोकल ठाकुर्ली स्थानकात पोहोचताच तीन जणांनी मिळून संबंधित प्रवाशावर थेट कोयत्याने हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये एकच घबराट आणि पळापळ उडाली. वार केल्यानंतर तिन्ही आरोपी लोकलधून ठाकुर्ली स्थानकात उतरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
'मशीन काढ' म्हणत हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई लोकल मधील फिल्मी स्टाईल हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल दृश्यांमध्ये प्रवासी एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या वादादरम्यान एका व्यक्तीकडून “मशीन काढ” अशी हाकही ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे.
रेल्वे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
काही दिवसांपूर्वीच लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता ठाकुर्ली स्थानकात कोयता हल्ला झाल्याने रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि लोहमार्ग पोलीस केवळ नावापुरतेच आहेत का, असा सवाल केला जात आहे.